प्रिया दत्त (Photo credit : Twitter)

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना एक झटका मिळाला आहे. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी यासंदर्भात एक पत्र राहुल गांधी यांना पाठवून, आपल्या निर्णयाची कल्पना दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे प्रिया दत्त यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रिया दत्त यांनी कौटुंबिक कारण देत, आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले आहे.

याबाबत बोलताना प्रिया दत्त म्हणाल्या, ‘मागील काही वर्षे ही माझ्यासाठी अतिशय चांगली होती. मात्र राजकीय कारकीर्द आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या एकत्र पार पाडताना माझी तारेवरची कसरत होत होती. माझ्या परीने सर्वोतोपरी प्रयत्न करून मी हे सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र आता मला इतर काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचे आहे’.

प्रिया दत्त कॉंग्रेस पक्षातील गटबाजीला कंटाळल्या आहेत हे जगजाहीर आहेच. याआधीही त्यांनी पक्षांतर्गत गटबाजी आणि कामकाजावर टीका केली होती. 2017 च्या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसपक्षाला फार मोठा पराभव सहन करावा लागला होता, त्यावेळी ‘स्वतःच्याच आजारांनी पक्ष आजारी आहे’ अशी टीका प्रिया दत्त यांनी केली होती. दरम्यान प्रिया दत्त यांना अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या सचिवपदावरून हटवण्यात आले होते. प्रिया दत्त या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून खासदार होत्या. 2014 लोकसभा निवडणूकीत भाजपाचे प्रमोद महाजन यांच्या कन्या भाजप खासदार पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता.