Hanging | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर (Sinner) तालुक्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सासरच्या छळास कंटाळून एका गर्भवती महिलेने आत्महत्या (Pregnant Woman Suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी (7 डिसेंबर) घडली आहे. याप्रकरणी मृत महिलेचा पती, सासू, सासरा, दीर आणि मोठी जाव यांच्याविरोधात सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना 11 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. लग्नात मानपान दिला नाही आणि गर्भपात करण्यास नकार दिल्याने सासरच्या मंडळींकडून झालेल्या शारीरिक व मानसिक छळास कंटाळून संबंधित महिलेने आत्महत्या केली आहे, अशी माहिती मृताच्या आईने पोलिसांना दिली आहे.

ऊर्मिला रोशन वाणी (वय 20, रा. बारागाव पिंप्री, ता. सिन्नर) असे आत्महत्या करणाऱ्या माहिलेचे नाव आहे. उर्मिला यांचा साडेपाच महिन्यांपूर्वीच रोशन वाणी याच्याशी लग्न झाले होते. लग्नात मानपान दिला नाही म्हणून उर्मिलाची सासू लताबाई वाणी, सासरा केरू वाणी, दीर संदीप वाणी आणि मोठी जाव कोमल तिला मानसिक त्रास देत होते. दरम्यान, उर्मिला हे गर्भवती असल्याचे तिच्या सासरच्या मंडळीला कळाले. परंतु, कोमलही गर्भवती असल्याने शेतातील व घरातील कामे करण्यासाठी ऊर्मिलाने गर्भपात करावा, यासाठी सासरची मंडळी ऊर्मिलावर दबाव आणत होते. मात्र, उर्मिलाने गर्भपात करण्यास विरोध केल्याने सर्व आरोपींनी तिला शारीरिक त्रासही देऊ लागले. अखेर या छळास कंटाळून उर्मिलाने सोमवारी गळफास लावून आत्महत्या केली. हे देखील वाचा- PUBG गेमच्या व्यसनातून 14 वर्षीय मुलाची आत्महत्या; नाशिक येथील राहत्या घरी गळफास घेऊन संपवले जीवन

उर्मिलाची आई कल्पना कदम यांच्या तक्रारीनंतर पोलिसांना सासरच्या मंडळी विरुद्ध तक्रार दाखल केली. तसेच लग्न झाल्यापासून आपल्या मुलीला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावा लागत होते. याबाबत तिने आपल्या नातेवाईकांनाही सांगितले होते. एवढेच नव्हेतर, तिचा पती रोशन हादेखील ऊर्मिलाच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून घरच्यांचे ऐकत होता, असेही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या घटनेनंतर सिन्नर तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. याआधीही अनेक महिलांनी आपल्या सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक हुंडाबळीच्या तक्रारीची नोंद आहेत.