Prakash Ambedkar: ऊसतोड कामगारांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा पाठिंबा

ऊसतोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांना दीडशे टक्के वाढीव भाव मिळावा म्हणून अनेक दिवसांपासून ऊसतोड मजूर संघटनांनी संप पुकारला आहे. ऊसतोड कामगारांच्या या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पाठिंबा दर्शवला आहे. ऊस कामगारांनी त्यांचे आंदोलन सुरुच ठेवावे. आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची संधी चालून आली आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ऊसतोड मजुराला 1 टन ऊसामागे मशिनच्या तुलनेत कमी पैसे मिळतात. त्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी थोडे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर लक्ष घालावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज बीड येथे केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी भगवानगडाच्या पायथ्याशी ऊस कामगारांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांनी ऊस कामगारांच्या आंदोलनाचे समर्थन केले. ऊसतोड कामगारांनी आंदोलन करुन साखर कारखानदारांचे नाक दाबून ठेवले आहे. साखर कारखान्यांनी मशीनच्या साहाय्याने ऊस कापायचे ठरवले तरी 100 टक्के ऊसाची कापणी होत नाही. मशीन ही 6 इंचाच्या वरूनच ऊस कापते. मात्र, जास्त साखर ऊसाच्या खालच्या पेरात असते. त्यामुळे ऊसतोड कामगारांना मशीनच्या कापणीइतका दर मिळू शकतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. याशिवाय, प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ऊसतोड कामगारांच्या मजुरीसंदर्भात विधानसभेत कायदा मंजूर करण्याची मागणी देखील केली आहे. हे देखील वाचा- Shiv Sena Dasara Melava 2020: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नारायण राणे यांच्यावर जहरी टीका; शिवसेना दसरा मेळावाच्या भाषणात बेडूक म्हणून केला उल्लेख

दसऱ्यानिमित्त भगवान भक्ती गडावरुन पंकजा मुंडे यांनी जनतेशी ऑनलाइन संवाद साधला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या आहेत की, “बीड जिल्ह्याची मी भूमीपुत्र आहे. मी इथेच राहून देशाकडेही लक्ष देणार आहे. ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडवायला दिल्लीतही आपण काही लोकांना पाठवू. कार्यकर्ते आणि जनतेसोबत माझे कर्जदाराचे नात आहे, या कर्जातून माझी मुक्त होण्याची इच्छा नाही,” असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.