कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे जवळजवळ संपूर्ण उन्हाळा लॉक डाऊनमध्ये गेला. आता पावसाळा सुरु झाला आहे, मात्र अजूनही कोरोना विषाणूचे सावट तसेच आहे. मात्र असे काही लोक आहे ज्यांना सध्याच्या परिस्थितीमध्येही बाहेर फिरण्याची खुमकुमी आहे. त्यात पावसाळ्यामध्ये लोणावळा (Lonavala) म्हणजे जणू काही स्वर्गच. मुंबईहून अवघ्या एका तासाच्या अंतरावर आणि पुण्याहून त्याही कमी अंतरावर असलेल्या लोणावळ्यात, 130 हून अधिक पर्यटकांवर परमिटशिवाय प्रवास केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लोणावळ्यात पर्यटन-बंदीच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल पोलिसांनी 51 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
लॉकडाउन अजूनही सुरू असले तरी, अनेक लोक पावसाळ्यादरम्यान विविध पर्यटनस्थळांवर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. मात्र आता पोलिसांनी अशा पर्यटकांवर कारवाई करणे सुरु केले आहे. मास्क न घालता फिरणाऱ्या लोकांनाही दंड ठोठावण्यात आला आहे. मास्क नसलेल्यांकडून पोलिसांनी 12,964 रुपये दंड वसूल केला. लोणावळा आणि खंडाळा हे नेहमीच पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे. मात्र कोविड-19 प्रकरणांमुळे पुणे जिल्हा प्रशासनाने, लोणावळा आणि खंडाळासह मावळातील 31 पर्यटन स्थळांवर बंदी घातली आहे. आंतरजिल्हा प्रवासावर बंदी असूनही अनेक लोक विना पास प्रवास करीत आहेत.
(हेही वाचा: Monsoon Tips for Bike Riders: पावसाळ्यात बाईक चालवताना 'या' गोष्टींची घ्या काळजी)
पोलिसांनी याबाबत सांगितले की, अशा पर्यटकांना बाहेर येण्यापासून रोखण्यासाठी ते उपाय करीत आहेत. पुणे जिल्ह्यातील कोविड-19 रूग्णांची संख्या गेल्या 24 तासांत 1,245 ने वाढली आहे, अशाप्रकारे एकूण रुग्ण संख्या 29,844 झाली आहे. त्यामुळे लोक सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करीत नसतील, तर नियम अजून कठोर करावे लागतील अशा इशारा पुणे जिल्हा प्रशासनाने दिला आहे. तसेच लॉकडाऊन मार्गदर्शक सूचना पाळल्या जात आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी, पुणे जिल्ह्यात Flying Squads तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.