मीरा रोड (Mira Road) परिसरात स्थित सेव्हेन स्क्वेअर (Seven Square School) या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत काही दिवसांपूर्वी बजरंग दला (Bajrang Dal) तर्फे कोकण प्रांत शौर्य व बंदूक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावर आक्षेप घेत डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाने नवघर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे. या प्रशिक्षणात अल्पवयीन मुलांना बंदूक व पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोप या गटाने केला आहे. मीरा रोड मधील ही शाळा स्थानिक भाजपा आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्या मालकीची आहे. या शाळेत प्रशिक्षण चालू असतानाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते त्यानंतर या संघटनेने बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच आमदार मेहता यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
प्रकाश गुप्ता नामक एका व्यक्तीने फेसबुकवर या शिबिरातील फोटो शेअर केले होते, 25 मे ते 1 जून दरम्यान कोकण प्रांतातील विद्यार्थ्यांसाठी हे शिबीर राबविण्यात आले होते ज्यात 29 जिल्ह्यतील 130 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. व्हायरल फोटो मध्ये एक तरुण मुलांना बंदूक व रायफल चालवण्याचे प्रशिक्षण देत असल्याचे दिसत आहे.अल्पवयीन मुलांना शस्त्रप्रशिक्षण देऊन बजरंग दल ही कट्टर हिंदुत्वादी संघटना देशात हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे देखील युथ फेडरेशनच्या सचिवांनी म्हंटले आहे.
बजरंग दलाचे पदाधिकारी मात्र हे फोटो आपल्या शिबिरातील असल्याचे मान्य करायला तयार नाहीयेत. हे फोटो दुसऱ्या कुठल्या ठिकाणचे आहेत आपण आयोजित केल्या शिबिरात विद्यार्थ्यांना केवळ आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते असे त्यांनी ABP माझा ला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे. याबाबत आमदार नरेंद्र मेहता यांनी शाळेत आयोजित केल्या शिबिराशी आपला संबंध नसून सुट्टीच्या काळात विविध शिबिरांसाठी शाळेची जागा सशुल्क उपलब्ध करून दिली जाती त्यामुळे यात आपला वैयक्तिक सहभाग नसल्याचे स्पष्ट केलं आहे. बजरंग दलाने व्हेलेंटाईन डे दिवशी जोडप्याचे जबरदस्तीने लावले लग्न, हैदराबाद येथील घटना (Video)
तूर्तास नवघर पोलिसांकडून या व्हायरल फोटोचा तपास सुरु आहे.पोलिसांनी या शिबिराच्या आयोजकांशी संपर्क साधला असता आपण शिबिरात वापरलेल्या शस्त्रांसाठी आपल्यापाशी परवाना असल्याचे सांगण्यात आले होते त्यानुसार परवाना व फोटो शेअर केलेल्या व्यक्तीची चौकशी झाल्यावरच या प्रकरणाचा उलगडा होईल असे सांगितले जातेय. या फोटो मध्ये तथ्य आढळल्यास बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांसहित आमदार मेहता यांना देखील कठोर चौकशीला सामोरे जावे लागू शकते.