Pune Municipal Corporation | (File Image)

पुणे महानगरपालिकेने (PMC) विविध सरकारी संस्थांना (Government Institutions) थकीत पाणीपट्टी (Overdue Water Bill) वसूल करण्यासाठी नोटिसा बजावल्या आहेत. ज्यामध्ये या संस्थांना 31 जानेवारी 2024 पर्यंत 650 कोटी रुपयांहून अधिक थकीत बिलांची पूर्तता करण्याबात सांगण्यात आले आहे. जर विहीत कालावधीमध्ये पाणीबिल भरले नाही तर संबंधित संस्थांचा पाणीपुरवठा खंडीत करण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. पाठीमागील प्रदीर्घ काळापासून पुणे महापालिका सरकारी संस्थांकडून थकलेल्या पाणीपट्टीची वसूली करण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, या संस्थांच्या उदासीन कारभारामुळे त्यात वारंवार अडथळा येतो आहे. अखेर थकबाकीच्या दीर्घकालीन समस्येचे निराकरण करण्यासाठी एक निर्णायक पाऊल म्हणून पालिकेने पाणी जोडणीच कापण्याचा निर्णय घेतला आहे.

'..तर पाणीपुरवठा खंडित'

पीएमसी आयुक्त विक्रम कुमार यांनी सरकारी संस्थांनी वेळेवर देयके देण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. तसेच, सदर संस्थांनी निश्चित मुदतीपर्यंत बिले न भरल्यास पाणीपुरवठा खंडित केला जाईल. अत्यावश्यक सेवा कायम सरु ठेवण्यासाठी आणि पालिकेच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी या संस्थांनी आपली पाणीपट्टी वेळेत भरणे गरजेचे असते. या संस्था सामाजिक प्रतिनिधित्वही करत असतात. सबब, नागरिकांसमोर आदर्श ठेवण्यासाठी त्यांनी सार्वजनिक देयक (पाणीबिल) वेळेत भरणा करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. पाणीजोडणी कापण्याचे निर्णायक पाऊल पालिकेला उचलावे लागू नये यासाठी संस्थांनी सहकार्य करावे, असेही आयुक्तांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Mumbai Water Storage: मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणीसाठ्यात वाढ)

पाणीपट्टी वसूलीसाठी मोहीम

पुणे महापालिकेने पाठिमागील काही महिन्यांपासून पाणीपट्टी वसूलीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेतली आहे. धक्कादाय असे की, प्राप्त आकडेवारीनुसार एकट्या पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातून तब्बल 40 कोटी रुपये येणे बाकी आहे. देयकाची रक्कम भलीमोठी असल्याने पालिकेने सदर भागातील (थकीत इमारती) पाणीपुरवठा तात्परता खंडित केल्याचे समजते. पुणे कॅन्टोन्मेंटने तातडीने 2 कोटी रुपये भरले असूनही, उर्वरित थकबाकी कायम आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी पालिका आणखीच मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उरुळी देवाची, फुरसुंगी, मंतरवाडी या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा लाभ घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाइपलाइन, स्टोरेज टँक आणि वॉटर प्लांटचे काम पूर्ण होऊनही रेल्वेच्या परवानग्या मिळण्यास विलंब झाल्याने प्रकल्पात अडथळा निर्माण झाल्याचे पुढे येत आहे. दरम्यान, मुठा उजव्या कालव्यातील सांडपाणी वळवून पुणे कॅन्टोन्मेंट वॉटर ट्रीटमेंट प्लांटचे (WTP) पाणी लवकरच फुरसुंगीला थेट पाईपद्वारे नेण्यात येणार आहे. पाणी केंद्रावर पंप बसविण्याचे काम पुढील महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे, ज्यामुळे नियुक्त केलेल्या भागांना पाणीपुरवठा पुन्हा सुरू करणे शक्य होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी, 26 डिसेंबर रोजी या प्रकल्पाला भेट दिली. त्यानंतर या कामाला गती येणे अपेक्षीत आहे.