PMC Bank | (Photo Credits: PTI)

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (PMC Bank) ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. 22 नोव्हेंबर रोजी, रिझर्व्ह बँकेने (RBI) पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकचे युनिटी स्मॉल फायनान्स बँक (USFB) मध्ये विलीनीकरणासाठी मसुदा योजना जाहीर केली आहे. या मसुद्यानुसार, पीएमसी बँकेची मालमत्ता आणि दायित्वे यूएसएफबीकडे येतील. यामध्ये पीएमसी बँकेच्या ग्राहकांना पैसे परत करणे देखील समाविष्ट आहे. USFB सोबतच्या विलीनीकरणाच्या करारात अशा गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या आहेत, जेणेकरून ग्राहकांच्या पैशाचे रक्षण करता येईल.

आरबीआयने म्हटले आहे की, 'USFB 1,100 कोटी रुपयांच्या भांडवलाची स्थापना करत आहे, तर नियामक नियमांनुसार,एखाद्या छोट्या वित्त बँकेसाठी केवळ 200 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.' मसुदा योजनेअंतर्गत, 1900 कोटी रुपयांचे इक्विटी वॉरंट आहे, जे 8 वर्षांच्या कालावधीत कधीही वापरले जाऊ शकते. हे इक्विटी वॉरंट युनिटी स्मॉल फायनान्स बँकेला 1 नोव्हेंबर 2021 रोजी जारी करण्यात आले आहे. आरबीआयने या मसुद्यावर 10 डिसेंबरपर्यंत सूचना मागवल्या आहेत. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. (हेही वाचा: ST Worker Strike: एसटी संपाबाबत पुढील सुनावणी 20 डिसेंबरला, उच्च न्यायालयाकडून आंदोलकांना सवाल)

ज्या ग्राहकांचे पैसे PMC बँकेत अडकले आहेत, त्यांना पुढील तीन ते 10 वर्षात पूर्ण पैसे परत मिळतील. RBI च्या मसुद्याच्या योजनेनुसार, USF बँक ठेवीदारांना 5 लाख रुपयांची हमी रक्कम देईल. त्यानंतर, बँक दोन वर्षांनी 50,000 रुपये, तीन वर्षांनी 1 लाख रुपये, चार वर्षांनी 3 लाख रुपये, 5 वर्षांनी 5.5 लाख रुपये आणि 10 वर्षांनी संपूर्ण रक्कम देईल. युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड हा सेंट्रम ग्रुप आणि भारतपे यांचा संयुक्त उपक्रम आहे. बँकेने 1 नोव्हेंबर 2021 रोजी स्मॉल फायनान्स बँक म्हणून कामकाज सुरू केले.