PMC Bank (Photo Credits: IANS)

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (PMC) बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदविला आहे. त्यानंतर होत असलेल्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. या बँकेमधील कर्जाची माहिती लपवण्यासाठी तब्बल 21 हजार खोटी खाती उघडण्यात आली आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, सोमवारी बँकेविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये हा खुलासा झाला. अहवालानुसार, एनपीएची माहिती लपवून ठेवून नियमांविरूद्ध कर्ज वितरित केल्याचा आरोप बँक व्यवस्थापनाला होत आहे.

रिअल इस्टेट फर्म हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडवर (HDIL) पीएमसी बँकेचे अडीच हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना असूनही बँकेने दिवाळखोर एचडीआयएल कंपनीला हे कर्ज दिले. त्यानंतरही कंपनीने कर्जाची रक्कम फेडली नाही. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अशा परिस्थितीत बँकेने तोट्याचा उल्लेख करणे अपेक्षित होते. मात्र बँकेने ही माहिती लपवली, तसेच ही माहिती दाबण्यासाठी नवी 21 हजार खोटी खाती बनवली. इतकेच नाही तर पीएमसीची रोख राखीव रक्कम फक्त एक हजार कोटी रुपये असताना, कंपनीला 2,500 कोटी रुपयांचे कर्ज दिले. (हेही वाचा: PMC Bank Crisis: मुंबई पोलिसांकडून HDIL आणि PMC बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; निलंबित संचालकाचेही नाव सामील)

कंपनीला बँकेने तब्बल 44 कर्जे दिली होती, व ही कर्जाची माहिती दाबली जावी यासाठी 21 हजार खोटी खाती उघडण्यात आली. दरम्यान, या बाबत हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (HDIL) च्या अधिकाऱ्यांविरुद्ध, बँकेचे अधिकारी, बँकेचे माजी संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर कलम 409, 420, 465, 466, 471 आणि 120 बी अंतर्गत नोंदविण्यात आला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ईओडब्ल्यूने एक विशेष तपास पथक (STI) देखील स्थापन केले आहे.