पंजाब अॅन्ड महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एचडीआयएलचे प्रमुख सारंग आणि राकेश वाधवान यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या पितापुत्र्याने त्यांची संपत्ती विकण्यास हरकत नसल्याचे बुधवारी उच्च न्यायालयाला सांगितले. मात्र आता तरी कोर्टाने जामीन द्यावा अशी अपेक्षा वाधवान यांनी केली. परंतु हायकोर्टाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला आहे.
सरोश दमानिया या पीएमसी बँक खातेधारकाने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. तर न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी पार पडली. दाखल करण्यात आलेल्या याचिकेत असे म्हटले होते की, आरोपींची मालमत्ता जप्त करुन तिचा लिलाव करुन त्यामधील पैसे खातेधारकांना देण्यात यावे. तर वाधवान यांनी त्यांची संपत्ती लिलाव करण्यास मंजूरी दिल्याने आता खातेधारांना दिलासा मिळाला आहे.(PMC बॅंक खातेदारांना RBI ची दिलासादायक बातमी)
काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, पीएमसी बँकेचे 78 टक्के खातेदार आपली पूर्ण रक्कम बँकेतून काढू शकतात असे स्पष्ट केले होते. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत (Emergency) बँकेतून 1 लाख रुपयांपर्यंत पैसे काढण्याची मर्यादा तशीच ठेवली आहे. वैद्यकीय उपचार, विवाह, शिक्षण, उपजीविका आणि इतर महत्वाच्या समस्या असलेले ठेवीदार, प्रशासकाकडे 1 लाख रुपये काढण्याचा अर्ज देऊ शकतात. प्रशासक योग्यतेनुसार त्या अर्जाचा निर्णय घेईल. तर सामान्य स्थितीत काढण्यात येणाऱ्या पैशांची मर्यादा अद्याप 50 हजार रुपये आहे.