काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारनं सैन्याकडे दुर्लक्ष केलं,  एनडीए सरकारने जवानांसाठी बुलेटप्रूफ जाकेटं खरेदी केली: नरेंद्र मोदी
PM Narendra Modi At Nashik | (Photo Credits: Twitter )

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने भारतीय सैन्याकडे कमालीचं दुर्लक्ष केलं. पण, केंद्रातील एनडीएप्रणीत भाजप सरकारने जवानांसाठी बुलेटप्रूफ जाकेटं खरेदी केली. भारतीय लष्कराच्या ताफ्यात लवकरच राफेलसारखी अत्याधुनिक विमानं दाखल होत आहेत, ज्यामुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे, असे सांगत केंद्र सरकारने राबविलेल्या विविध उपक्रमांचा पाढा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे वाचला. या वेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis)   यांच्या कारभाराचे कौतुक केले. राज्यात बहुमत नसतानाही देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार चांगल्या पद्धतीने चालवले, अशी शाबासकीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. महाराष्ट्र भाजप (BJP) आयोजित महाजनादेश यात्रा (Maha Janadesh Yatra) समारोप कार्यक्रमास नाशिक (Nashik) येथे पार पडला. या कार्यक्रमास पंतप्रधान मोदी यांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमात मोदी नाशिक येथील तपोवन परिसरातील मिनाताई ठाकरे स्टेडियम येथे बोलत होते.

या वेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यात्रेनंतर महाराष्ट्रातील जनतेला नमन करण्यासाठी मी येथे आलो आहे. आज मला छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी मला पगडी घातली. ही पगडी हा माझ्यासाठी सन्मान आहे. त्यासोबत छत्रपतींच्या कार्याशी एकनिष्ठ राहण्याची जबाबदारीही माझ्यावर आहे, असेही मोदी म्हणाले.

पुढे बोलताना मोदी म्हणाले की, महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलंय की, जनता आपला आशीर्वाद त्यांनाच देणार जे अपेक्षेनुसार काम करणार आहेत. महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे कोणतेही सरकार पाच वर्षे चाललं नाही, वसंतराव नाईक यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीच पाच वर्षे महाराष्ट्राची सेवा केली. राज्यात पूर्ण बहुमत नसतानाही स्थिर सरकार दिलं. पूर्ण बहुमता शिवाय फडणवीस सरकारने प्रगतिशील, विकसनशील राज्य दिले, अशी कौतुकाची थापही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली.