PM Narendra Modi Dehu Visit: 14 जून रोजी पीएम नरेंद्र मोदी देहूच्या दौऱ्यावर; तुकाराम महाराजांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे करणार लोकार्पण
PM Narendra Modi | (Photo Credits: Facebook)

पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी पुण्यापासून 30 किमी अंतरावर असलेल्या देहू येथे येणार आहेत. या ठिकाणी त्यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीचा, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडेल. देहू हे 17 व्या शतकातील संत तुकारामांचे जन्मस्थान आहे. तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पणासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात पायी जाणाऱ्या संत तुकारामांच्या भक्तांशी संवाद साधणार आहेत. या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास महाराष्ट्रातील वारकरी, दिंड्या उपस्थित राहणार आहेत. जवळपास 30-40 हजार जणांचा समुदाय कार्यक्रमास येणार असल्याचे विश्वस्त संजय महाराज मोरे यांनी सांगितले.

अधिक माहिती देताना जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन मोरे म्हणाले की, शिळा मंदिर हे एका दगडी पाटाला समर्पित केलेले मंदिर आहे, ज्यावर संत तुकारामांनी 13 दिवस तप केले होते. त्याचबरोबर शिळेजवळील मंदिरात संत तुकारामांची नवीन मूर्ती बसवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. पौराणिक कथेनुसार, पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली होती.

त्यांनी सांगितले होते की, परमेश्वराची इच्छा असेल तर या गाथा परत येतील. त्यावेळी तिथल्या शिळेवर बसून तुकारामांनी 13 दिवस ध्यान केले, त्यानंतर पाण्याचा कोणताही परिणाम न होता, गाथा नदीत तरंगताना आढळल्या. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस 'तुकाराम बीज' म्हणून ओळखला जातो. वारकरी, आषाढ आणि कार्तिक वारीवेळी पंढरपूरच्या यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी तुकारामांच्या शिला मंदिरात प्रार्थना करतात. (हेही वाचा: Ashadhi Wari 2022: संत गजानन महाराजांच्या पालखीचं आषाढी वारीकरता पंढरपूरकडे प्रस्थान)

दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मोदींनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (NH-965) आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (NH-965G) च्या प्रमुख भागांच्या चौपदरीकरणाची पायाभरणी केली होती. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची ये-जा सुरळीत व्हावी यासाठी महामार्गाच्या कडेला समर्पित पदपथ बांधण्यात येत आहेत.