सध्या राज्यात कोरोना विषाणूचा (Coronavirus) कहर वाढत आहे. नागपूरसह (Nagpur) अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरु आहे, पुण्यात कडक निर्बंध लादले गेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर जास्त गर्दी होऊ नये म्हणून मुंबई महानगर प्रदेशातील काही महत्त्वाच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत वाढविण्यात आली होती. आता मध्य रेल्वेने (Central Railway) महाराष्ट्रातील नागपूर आणि भुसावळ (Bhusawal) विभागातील काही प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या (Platform Ticket) किंमती वाढवल्या आहेत. शुक्रवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
10 मार्च रोजी घेण्यात आलेल्या निर्णयानुसार भुसावळ विभागातील नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, मडगाव, शेगाव, अकोला, अमरावती आणि खंडवा स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत आता 50 रुपये असेल. यासह नागपूर स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकिट आता 50 रुपये असेल तर नागपूर विभागातील बैतूल, चंद्रपूर, बल्हारशाह आणि वर्धा स्थानकांवर हे तिकीट 30 रुपये असेल. पूर्वी या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची किंमत 10 रुपये होती. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले की, तिकिटाचे दर वाढविण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि कधीकधी गर्दी नियंत्रित करण्यासाठी काही काही काळासाठी नवे दर लागू केले जातात.
(हेही वाचा: Parbhani Lockdown: परभणी मध्ये आज रात्रीपासून लॉकडाऊन; सहकार्य करण्याचे नवाब मलिक यांचे नागरिकांना आवाहन)
ते पुढे म्हणाले, ‘बहुतेकदा सण-उत्सव आणि जत्रा इत्यादी काळात असे बदल केले जातात आणि नंतर हळूहळू किंमती कमी केल्या जातात. यावेळी कोविड-19 साथीच्या रोगाने उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी हे केले गेले आहे. हा निर्णय जनहितार्थ घेण्यात आला आहे.’ प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती वाढविण्याच्या या निर्णयाची अंमलबजावणी भुसावळ विभागात 10 जून आणि नागपूर विभागात 8 जूनपर्यंत होईल. दरम्यान, मुंबईमध्ये वाढवण्यात आलेले नवीन दर फक्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, दादर, ठाणे, कल्याण आणि भिवंडी रोड स्थानकांवर लागू असणार आहे.