देशातील इंधनदरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे. मात्र दरवाढ सुरुच आहे. परंतु, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या वाढदिवसानिमित्त मनसेने नाशिककरांना दिलासा दिला आहे. राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त नाशिक (Nashik) मध्ये पेट्रोल (Petrol) 53 रुपये लीटर ने विकले जात आहे. नाशिक शहरामध्ये आज पेट्रोलचा दर 103 रुपये प्रती लीटर तर डिझेल 93.65 रुपये या दराने विकले जात आहे. त्यामुळे जवळपास निम्म्या दराने आज नाशिकात पेट्रोल विक्री होत आहे. त्यामुळे नाशिककर नक्कीच सुखावले असणार.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसैनिक अनेक ठिकाणांहून 'कृष्णकुंज' येथे दाखल होतात. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पत्र लिहून कार्यकर्त्यांना घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. सध्याच्या परिस्थितीत काळजी, खबरदारी घेणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे माझी भेट घ्यायला येवू नका. जिथे आहात तिथेच रहा. कुटुंबियांची आणि आसपासच्या लोकांची काळजी घ्या. आजवर राखलतं तसं परिस्थितीचं भान यापुढेही राखा, असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, काल पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवली मध्ये 1 रुपये प्रती लीटर आणि अंबरनाथ येथे 50 रुपये दराने पेट्रोल विक्री होत होती. ही ऑफर दोन तासांपुरतीच मर्यादीत होती. मात्र या ऑफरचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. डोंबिवली एमआयडीसी येथील उस्मा पेट्रोल पंपवर सकाळी 10 ते 12 या वेळेत 1 रुपयांत पेट्रोल मिळत होते. तर अंबरनाथ पश्चिमेकडील विमको नाक्यावरील पेट्रोल पंपावर सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत 50 रुपयांत पेट्रोल विकले जात होते.