महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण कोरोना विषाणूचे (Coronavirus) 71,356 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.60% वर पोहोचले आहे. राज्य सरकारने वेळोवेळी योजलेल्या उपयोजना आणि त्याला नागरिकांनी दिलेली साथ यामुळे हे शक्य झाले. यामध्ये कोरोना विषाणूच्या चाचाण्यांनीही महत्वाची भूमिका बजावली आहे. आता कोरोना चाचणी दरात राज्य शासनाकडून सहाव्यांदा कपात करण्यात आली आहे. आता 980 रुपयांऐवजी ही चाचणी 700 रुपयांमध्ये होणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले. ‘देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना विषाणू वाढीचा दर अतिशय कमी आहे. राज्यात आठवड्याला 0.21 टक्के हा ग्रोथ रेट आहे. रुग्ण वाढीचा दर 323 दिवसांच्या वर गेला आहे.’ महाराष्ट्रात वाढलेल्या कोरोनासाठी टोपे यांनी इथल्या नागरीकरणाला जबाबदार ठरवले. मात्र या विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनाने केंद्राच्या मदतीने बरेच प्रयत्न केले आहेत, असेही ते म्हणाले.
पुढे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राने कोरोना रुग्णांचा मागोवा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले. कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवली. यामध्ये राज्यात कोरोना चाचण्यांचे दर सातत्याने कमी केले जात असून केंद्र शासनाने निश्चित केलेल्या 4500 रुपयांवरुन आता 700 रुपयांमध्ये खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या होणार आहेत, असे ते म्हणाले. राज्य शासनाने कोरोना उपाययोजनांसंदर्भात निर्णय घेताना सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून निर्णय घेतले आहेत. चाचण्यांचे दर कमी करतानाच खासगी रुग्णालयातील 80 टक्के खाटा राखीव ठेवल्या आहेत. ‘एचआरसीटी’ चाचण्यांचे दर निश्चित केले. आहेत, तसेच प्लाझ्मा बॅगचे दरदेखील निश्चित करण्यात आले. (हेही वाचा: राज्यावर आलेल्या संकटांबाबत सरकारने कोणत्या उपयोजना राबवल्या? जाणून घ्या काय म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार)
यासह मास्कच्या किमतीवरही नियंत्रण आणले गेले आहे. या सर्व उपाययोजना करतानाच नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सारख्या मोहिमेद्वारे आरोग्य तपासणीसोबतच जाणीव जागृतीदेखील करण्यात आली आहे. आता राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी सुरू असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेप्रमाणे बूथ करुन लसीकरण करण्यात येणार आहे.