किर्तनकार इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होणार? गर्भलिंग निदानाच्या 'ऑड-इव्हन' फॉर्म्युल्यासंदर्भात केलं 'हे' वादग्रस्त विधान
Indurikar Maharaj (PC - Facebook)

किर्तनाच्या विशिष्ट शैलीमुळे महाराष्ट्रात चर्चेत असलेले अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. निवृत्ती इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj) त्यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे (Controversial Statement) अडचणीत सापडले आहेत. त्यांनी आपल्या एका किर्तनामध्ये लोकांना गर्भलिंगाविषयीचा 'ऑड-इव्हन फॉर्म्युला' (Odd-Even Formula) सांगितला आहे.

'सम संख्येला संग केल्यास मुलगा जन्माला येईल. तर विषम तारखेला संबंध आल्यास मुलगी जन्माला येईल,' असं इंदोरीकरांनी आपल्या किर्तनात म्हटलं होतं. या प्रकरणी त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता इंदोरीकर यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा - भाजप ही देशावरील आपत्ती, काहीही करुन ती दूर करणे आवश्यक: शरद पवार)

इंदोरीकर महाराजांनी ओझर येथे झालेल्या किर्तनात 'सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा जन्मास येईल आणि विषम तारखेला स्त्री संग केल्यास मुलगी होते', असं वादग्रस्त वक्तव्य केलं होते. इंदोरीकर यांचे हे वक्तव्य गर्भलिंग निदान निवडीची जाहिरात असल्याचा आरोप PCPNDT (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act, 1994) समितीच्या सदस्यांनी केला आहे. या समितीने इंदोरीकर महाराजांना या प्रकरणी नोटीसही बजावली आहे. इंदोरीकर महाराज नेहमी आपल्या किर्तनातून सामाजिक आणि ज्वलंत विषयावर भाष्य करत असतात. मात्र, यावेळी त्यांनी गर्भलिंग निदानाबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.