Representational Images (File Photo)

पुण्यातील पिपरी चिंचवड  (Pimpri Chinchwad) भागामध्ये अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के.पद्मानाभन (R.K. Padmanabhan) यांनी एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. निलंबित करण्यात आलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव निलेश जगदाळे आहे. तर पोलिस कर्मचारी दत्तात्रय माळवदकर आणि राजेंद्र किरवे यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. सहाय्यक निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत केल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

तीनही पोलीस कर्मचारी चिखली पोलिस ठाण्याचे आहेत. या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. त्याच्या तक्रारीसाठी देण्यासाठी पीडित मुलीचे वडील अनेकवेळा चिखली पोलिस चौकीत गेले होते. पोलिस चौकीत असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. अखेर पिडीत मुलीच्या वडिलांनी पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांची भेट घेऊन सारा प्रकार सांगितला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आयुक्‍तांनी प्रकरणाची चौकशी सुरु केली. पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी हालगर्जीपणा केल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस आयुक्‍तांनी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह दोन पोलिस कर्मचार्‍यांना तात्काळ निलंबीत केले आहे. इतर ३ पोलिस कर्मचार्‍यांनादेखील दणका देत तात्काळ कंट्रोल रूमला संलग्न करून घेतले आहे.