गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या तुफानी पावसाने महाराष्ट्राची पुरती दैना केली आहे. अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा येथे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून अनेक लोक पुरात अडकले आहेत. तर काहींना आपले प्राणही गमावावे लागले. पुरामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले असून काही पूरग्रस्तांची सुखरुप सुटका करण्यात आणि नागरिकांचे स्थलांतर करण्यात प्रशासनाला यश आले आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावत असताना आता मात्र पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूरच्या अंबाबाई चरणी गावकऱ्यांनी पदर पसरला आहे.
पश्चिम महाराष्ट्रावर ओढावलेले पुराचे संकट दूर करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या वतीने 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी स्तंभन अनुष्ठान विधीचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळपासून सुरु झालेल्या या विधीत महासंकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या (शनिवार, 10 ऑगस्ट) सकाळी 8 ते 12 या वेळेत अभ्यंकर इंद्र, जलापत् शमनी तारा, ऋष्यशृंग ऋषी जपानुष्ठान आणि रविवारी (11 ऑगस्ट) सकाळी क्षेत्र स्वामिनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) उपासना, सप्तशती पठण, नवार्ण मंत्र जप, ललिता सहस्त्रनाम पठण (श्रीचक्रार्चन) या सप्तशतीतील उपायात्मक मंत्र जपाचे पठण करण्यात येणार आहे. या मंत्रजपपठणात सर्व भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे. (महाराष्ट्रातील पूरपरिस्थितीचे ताजे अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (8 ऑगस्ट) कोल्हापूर, सांगली, सातारा येथे दौरा केला. तर आज (9 ऑगस्ट) जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पूरग्रस्तांच्या भेटीला गेले होते. तर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे देखील पूरग्रस्त भागाची पाहाणी करणार आहेत. तसंच या राज्यात उद्भवलेल्या या भयंकर परिस्थितीत जनादेश, शिवस्वराज्य या राजकीय यात्रा स्थगित करण्यात आल्या आहेत.