Live
पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आणि सांगली मधून आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू: Maharashtra Monsoon & Flood 2019 Live Updates
महाराष्ट्र
Siddhi Shinde
|
Aug 09, 2019 06:48 PM IST
मागील काही दिवसात कोल्हापूर (Kolhapur) , सांगली (Sangali) , सातारा (Satara) सह राज्यात अनेक ठिकाणी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. सततच्या पावसामुळे हे परिसर पूर्णतः जलमय झाले आहेत. या ठिकाणची अनेक दृश्य वारंवार समोर येत असून लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच या पुराचा जबर फटका बसल्याचे समजत आहे. यामुळे आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रात 28 जणांचे बळी गेले असून 239 गावांमधून 1 लाख 11 हजार 365 लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या ठिकाणच्या नागरिकांच्या बचावकार्यासाठी लष्कर, नौसेना, एनडीआरएफ युद्धपातळीवर कार्यरत आहे, मात्र अद्याप परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश आलेले नाही.
अशातच , कोल्हापूर मध्ये पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यातच राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडल्याने येथील नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, Skymet तर्फे वर्तवण्यात आलेल्या शक्यतेनुसार आज आणि उद्या म्हणजे 9 व 10 ऑगस्ट ला मुंबई सह कोकणात मुसळधार पाऊस होणार आहे. तसेच येत्या दोन ते चार तासात मुख्यतः उत्तर मुंबईत सह उपनगरात जोरदार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे.