Mumbai Rains: मुंबई मध्ये शनिवारच्या सकाळी आज जोरदार पावसाने दिवसाची सुरूवात; वाहतूक सेवा सुरळीत
Rains | | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

सप्टेंबर महिना सरायला आला तरीही महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची तुफान बॅटिंग सुरूच आहे. आज (24 सप्टेंबर) शनिवारची सकाळ देखील काही मुंबईकरांसाठी तुफान पावसाची झाली आहे. मुंबईच्या काही भागात आज सकाळी 7 ते 8 या तासाभरात जोरदार पाऊस झाला आहे. पाऊस तासभर कोसळलाअसला तरीही कुठेही पाणी साचल्याच्या किंवा त्याचा वाहतूकीवर परिणाम झाल्याचा तसेच सार्वजनिक वाहतूक सेवा खंडीत झाल्याचे वृत्त नाही. मुंबईची लाईफलाईन रेल्वे देखील सुरळीत सुरू आहे. पावसाने तासभर धूमशान घातल्यानंतर विश्रांती घेतली आहे.

पालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार तासभर पावसात दादर फायर स्टेशन आणि रावेळी कॅम्प मध्ये 28 एमएम पाऊस झाला आहे. एफ नॉर्थ मध्ये 21 एमएम, एफ साऊथ मध्ये 18 एमएम, वडळा फायर स्टेशन मध्ये 17 एमएम आणि ब्रिटानिया रे रोड मध्ये 12 एमएम पाऊस झाला आहे. पूर्व उपनगरामध्ये एम ईस्ट आणि एल ईस्ट भागात अनुक्रमे 17 एमएम आणि 12 एमएम पाऊस झाला आहे. तर एसडब्लूएम वर्कशॉप मध्ये 20 एमएम, कूपर हॉस्पिटल आणि एच ईस्ट वॉर्ड मध्ये 18 एमएम, अंधेरी फायर स्टेशन मध्ये 17 एमएम आणि वर्सोवा पम्पिंग स्टेशन मध्ये 14 एमएम पाऊस झाला आहे.

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये कोठेही पावसामुळे पाणी साचलेले नाही. बस, ट्रेन सेवा देखील सुरळीत सुरू आहे. कोठेही बेस्ट ने बसला डायव्हर्जन दिलेले नाही.

आज सकाळी 8.30 पर्यंत झालेला पाऊस पाहता मुंबई शहरात 27.45 एमएम, पूर्व उपनगरामध्ये 5.24 एमएम आणि पश्चिम उपनगरामध्ये 9.38 एमएम पाऊस झाला आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज ढगाळ वातावरण राहील. अधून मधून पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.