Waterfall | Representational image (Photo Credits: pxhere)

नवी मुंबईतील खारघरजवळील पांडवकडा धबधब्यावर वर्षासहलीसाठी गेलेल्या 13 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्यावरही पर्यटकांना जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, तरीही अनेक पर्यटक धबधब्यावर जातात. अनेक पर्यटक वर्षा सहलीच्या नावाखाली मनाई झुगारुन देखील पर्यटनासाठी बाहेर पडतात. अशातच या धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. (हेही वाचा - Thane: घोडबंदर रोडवर मोटारसायकलची खांबाला धडक; दुचाकीला आग लागल्याने 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू)

पांडवकडा धबधब्यावर शनिवारी 13 वर्षीय हर्ष गौतम हा मुलगा मित्रांसोबत पर्यटनासाठी गेला होता. त्याचा पाय घसरला. तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती खारघर पोलिसांनी दिली. हर्ष हा खारघर येथे राहत होता. 'हर्ष पाय घसरून पडल्यावर त्याच्या मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या मित्राचा पायही घसरला. परंतु तो सुखरुपपणे बाहेर आला', असेही पोलिसांनी सांगितले.

घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी अवघ्या 5 मिनिटांतच घटनास्थळी पोहचले. परंतु मुसळधार पावसामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. 'शोध घेऊनही सूर्यास्तापर्यंत मुलाचा मृतदेह सापडला नाही. रविवारी सकाळी तो मुलगा ज्या ठिकाणाहून पडला होता. त्या ठिकाणाहून 50 मीटर अंतरावर मृतदेह आढळून आला.