कोल्हापूरातील (Kolhapur) कणेरी मठावरील (Kaneri Math) पंचमहाभूत महामंगल सोहळ्याला (Panchamahabhut Mahamangal Sohala) गालबोट लागलं आहे. कणेरी मठाजवळ असलेल्या गोशाळेमधील 52 गायी दगावल्या असल्याची माहिती समोर आली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, या गायींचा मृत्यू शिळे अन्न खायला दिल्याने झाला असल्याचं सांगितलं आहे. सध्या पंचमहाभूत महामंगल सोहळ्यामुळे इथे अनेकांची ये जा सुरू आहे.
गोशाळेतील 30 गायींवर उपचार सुरू असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे. सिद्धगिरी मठावर आयोजित या सोहळ्यामध्ये अनेक प्रजातीच्या गायी म्हशींसोबतच बकर्या, घोडे, गाढवं, मांजरी, कुत्री यांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. 21-23 फेब्रुवारी दरम्यान त्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
प्राण्यांच्या प्रदर्शनासोबतच प्रत्येक जनावरांच्या विविध गटांत भव्य स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी 69 लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. जनावरांच्या सौंदर्य स्पर्धेत सर्वात सुंदर जनावरांना 21 हजारांपासून ते लाखापर्यंतची बक्षिसे देण्यात येतील.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. लोकांसाठी बनवलेले अन्न मोठ्या प्रमाणात वायाजात होतं. हेच उरलेलं अन्न प्राण्यांना खाऊ घातल्याने कदाचित विषबाधेतून गायींचा मृत्यू झाल्याची आता चर्चा आहे.