पालघर: भूकंप जनजागृती अभियानात विद्यार्थ्यांना आगीतून उड्या मारायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड; वाचा सविस्तर
Image For Representations (Photo Credits: Facebook)

डहाणू (Dahanu) तालुक्यातील चिंचले (Chinchle) आणि धुंदलवाडी (Dhundalwadi)  येथील आश्रमशाळांत अलीकडेच भूकंप जनजागृती अभियान राबवण्यात आले होते, यात भूकंप झाल्यास करण्यात येणाऱ्या सुरक्षा उपाययोजना आणि बचावकार्य याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. मात्र हे प्रशिक्षण देताना चक्क विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केल्याचे समोर येत आहे. याबाबत लोकसत्ताने दिलेल्या वृत्तात प्रशिक्षकांकडून अभियानात विद्यार्थ्यांना  आगीवरून उडय़ा मारायाला लावल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी या तालुक्यांमध्ये गेल्या वर्षभरापासून सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. या भागात माती आणि विटांची घरे आहेत. भूकंप होऊन शॉर्टसर्किट झाल्यास आगीतून बचावासाठी प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनरकडून हे प्रशिक्षण दिले गेले.

प्राप्त माहितीनुसार, या अभियानात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना आगीवरून उडय़ा मारणे, दोरीवरून चढणे, 20 फुटावरून उडी मारणे, 30 फूट उंचीच्या जाळीवर चढणे असे प्रकार सुद्धा करून घेण्यात आले. लहान मुलांसोबत असे प्रयोग करणे हे त्यांच्या जीवाशी खेळण्याचा अघोरी प्रकार आहे असे मत या वृत्ताच्या नंतर सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या घटनेवर डहाणू येथील तहसीलदार राहुल सारंग यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत आपत्तीजनक परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सर्व दक्षता घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना त्यासाठी प्रात्यक्षिक पूर्व प्रशिक्षण दिल्यानंतरच प्रात्यक्षिक घेतले गेले होते असा दावा केला आहे.