Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

मुंबई (Mumbai) स्थित डॉक्टरने आपल्या महिला कर्मचारीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. पालघर जिल्ह्यात ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेने डहाणू पोलिस स्थानकांत (Dahanu Police Station) या विरुद्ध तक्रार नोंदवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. (मित्राचा वाढदिवस साजरा करून घरी परतणाऱ्या तरूणीवर चालत्या कारमध्ये बलात्कार; लुधियाना शहरातील घटना)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै 2018 ते सप्टेंबर 2020 या कालवधीत आरोपी डॉक्टरने अनेक वेळा बलात्कार केल्याचे पीडित 30 वर्षीय महिलेने तक्रारीत म्हटले आहे. लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार बलात्कार करण्यात येत होता. इतकंच नाही तर तिच्या मनाविरुद्ध तिला गर्भपात करण्यासही भाग पाडले. तसे न केल्यास तिचे आक्षेपार्ह व्हिडिओज शेअर करण्याची धमकी देखील आरोपीने दिल्याचे पीडित महिलेने तक्रारीदरम्यान सांगितले. तसंच आरोपी पीडितेचा छळ करत असल्याचेही पोलिसांनी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या हवाल्याने सांगितले आहे.

PTI Tweet:

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नसल्याचे डहाणू पोलिस स्थानकातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 376, 376 (2)(n), 354(d) आणि 313 अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

काही दिवसांपूर्वी पालघर मध्ये शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या मुलीवर बलात्कार झाला होता. या घटनेनंतर पीडित 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आणि कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. नुकत्याच झालेल्या हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतरही बलात्काराच्या घटनांची मालिका थांबत नसल्याचे दिसून येत आहे. देशाच्या विविध भागांतून समोर येणाऱ्या बलात्कारच्या घटनांमुळे पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.