हिदुस्थान पेट्रो फोन (Hindustan Petro Foam) कंपनीला आज पहाटे 3 च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीमुळे कंपनीचे तब्बल 15 कोटींचे नुकसान झाले आहे. पालघरमधील (Palghar) वाडा (Wada) तालुक्यात बिलोशी (Biloshi) येथील परिसरात ही कंपनी आहे. या कंपनीत फोमचे उत्पादन केले जाते. शार्टसर्किटमुळे आग लागली, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवीतहानी झाली नाही. आगीला आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. तसेच ही आग कशामुळे लागली याची अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. मात्र, या आगीमुळे आजूबाजुच्या परिसरात भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.

पालघरमधील वाडा तालुक्यातील बिलोशी येथील फोमचं उत्पादन घेणाऱ्या हिंदुस्थान पेट्रो फोम कंपनीला आज पहाटे 3 च्या सुमारास भीषण आग लागली होती. वाडा तालुक्यामध्ये अग्नीशमन यंत्रणा नसल्याने आग विझविण्यासाठी वसई हून अग्नीशमनदलाच्या गाड्या बोलविण्यात आल्या. मात्र, वसई ते वाडा हे अंतर दोन तासाचे असल्याने गाड्या येईपर्यंत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. रात्री कंपनीचे उत्पादन बंद ठेवले जात असल्याने कामगार कामावर नव्हते. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या आगीत सुमारे 15 कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मालक राजकुमार बन्सल यांनी दिली. तसेच आग कशामुळे लागली याचा स्थानिक पोलीस शोध घेत आहे. आगीने एवढे रौद्ररुप धारण केले होते की, अवघ्या 2 तासात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. हे देखील वाचा- Dombivali Fire: डोंबिवलीत एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

वाडा तालुक्यातील कुडूस, खानीवली परिसरात सुमारे 500 पेक्षा अधिक औद्योगिक कारखाने आहेत. मात्र, या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नसल्याने याआधीही अनेक कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे या घटनेनंतर अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तसेच या आगीमुळे पुन्हा एकदा स्थानिक लोकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे.