
औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पैठण तालुक्यात (paithan) एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या (Triple murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत 6 वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला असून, जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज पहाटे घडली आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) हादरून सोडले आहे. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या हत्यामागचे नेमके कारण काय? याचाही शोध पैठण पोलीस करत आहेत.
संभाजी उर्फ राजू नारायण नेवारे (वय, 35), त्यांची पत्नी आश्विनी (वय, 30) आणि मुलगी सायली( वय, 10) , अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे अज्ञात हल्लेखोराने संभाजी निवारे यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबावर तीक्ष्ण हत्याराने भयानक हल्ला केला. या हल्ल्यात संभाजी, आश्विनी आणि सायलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, संभाजी यांचा धाकटा मुलगा सोहम थोडक्यात बचावला असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी निवारे यांच्या जवळच्या नात्यात लग्न होते. उशिरा रात्री जेवण करून सर्वजण झोपी गेले होते. पहाटे शेजाऱ्यांना संभाजी निवारे यांच्या घराचे दार उघडले दिसले. यामुळे शेजाऱ्यांनी घरात डोकावून पाहिले असता तिघांचे मृतदेह आढळून आले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. हे देखील वाचा- Leopard Attack: बीड जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलाचा मृत्यू; नागरिकांमध्ये दहशत
एकाच कुटुंबातील तिघांची का हत्या करण्यात आली, हत्येमागे हेतू काय आहे? संभाजी निवारे यांच्या कुटुंबीयाची हत्या केल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या हत्येमागच कारण काय याचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, घटनास्थळी तपास केला असता प्रथमदर्शनी चोरीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचे कुठलेही धागेदोरे सापडले नसून, पूर्ववैमनस्यातून हत्याकांड घडवण्यात आले असावे का? या दृष्टीने तपास केला जात आहे.