
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack), भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा रद्द करत त्यांना 27 एप्रिल 2025 पर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. तर वैद्यकीय व्हिसाधारकांना 29 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली. या आदेशानुसार, महाराष्ट्रात अल्पकालीन व्हिसावर राहणाऱ्या 55 पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिलपर्यंत राज्य आणि देश सोडण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले असून, मुदत संपल्यानंतर राहणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
केंद्र सरकारच्या गृह आणि परराष्ट्र मंत्रालयाने 24 एप्रिल 2025 रोजी एक कठोर निर्णय घेतला, ज्यामध्ये पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा (दीर्घकालीन, राजनैतिक, आणि अधिकृत व्हिसा वगळता) 27 एप्रिल 2025 पासून रद्द करण्यात आले. वैद्यकीय व्हिसाधारकांना दोन दिवसांची अतिरिक्त मुदत, म्हणजेच 29 एप्रिल 2025 पर्यंत, देण्यात आली. महाराष्ट्रात, राज्य गृह विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 55 पाकिस्तानी नागरिक अल्पकालीन व्हिसावर राहत आहेत, आणि त्यांना 27 एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागपूर: 18 नागरिक
ठाणे शहर: 19 नागरिक
जळगाव: 12 नागरिक
पुणे: 3 नागरिक
नवी मुंबई, मुंबई, रायगड: प्रत्येकी 1 नागरिक
नाशिकमधील अधिकाऱ्यांनी शहरात सहा पाकिस्तानी महिला राहत असल्याची पुष्टी केली, परंतु त्यांना त्यांच्या हद्दपारीबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आयुक्तालयाला परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाकडून (FRRO) कोणतीही लेखी सूचना मिळालेली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पीटीआयला सांगितले की, प्रशासन सतर्क आहे. आम्हाला अद्याप आदेशाची अधिकृत प्रत मिळाली नसली तरी, आम्ही आवश्यक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.’ (हेही वाचा: Pahalgam Terror Attack: 'राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी सैन्याच्या हालचालींचे थेट प्रक्षेपण दाखवू नये'; भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मीडिया चॅनेल्ससाठी जारी केली अॅडव्हायझरी)
महाराष्ट्र सरकारने सर्व जिल्हा पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना या नागरिकांचे निर्गमन सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली असून, कोणत्याही परिस्थितीत मुदत संपल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना राज्यात राहू दिले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पहलगाम येथील बैसारण खोऱ्यात 22 एप्रिल 2025 रोजी दुपारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. हा हल्ला लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी गटाने केल्याचा दावा आहे. हल्लेखोरांनी पर्यटकांचे नाव आणि धर्म विचारून प्रामुख्याने हिंदू पुरुषांना लक्ष्य केले, या हल्ल्याने भारत-पाकिस्तानमधील तणाव पुन्हा वाढला. भारताने हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांचा हात असल्याचा आरोप केला आहे.