नाशिक महापालिका अंतर्गत येणाऱ्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात (Dr Zakir Hussain Hospital) ऑक्सिजन गळतीची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या घटनेच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. तसेच, या घटनेत मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार, ही दुर्घटना घडली त्या वेळी रुग्णालयात सुमारे 150 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. त्यापैकी 22 जणांचा मृत्यू झाला. आणखीही 30 ते 35 रुग्ण अत्यावस्थ असल्याची माहिती आहे. त्यामुळे मृतांचा हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही घटना बुधवारी दुपारी 12.30 वाजता घडली.
दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांची गय केली जाणार नाही- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे की, “कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. अशात नाशिक महानगरपालिका रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेची बातमी धक्कादायक आहे, मन हेलावणारी आहे. ऑक्सिजन टाकीच्या गळतीने 22 रुग्णांना प्राण गमवावे लागले. हे दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. एकाएका कोरोना रुग्णास सावरण्यासाठी महाराष्ट्र शासन शर्थ करीत असताना असा अपघात आघात करतो. राज्याची संपूर्ण यंत्रणाच या युद्धात स्वतःला वाहून घेत आहे. मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन कसे करू? त्यांचे अश्रू कसे पुसू? अपघात असला तरी मृतांच्या नातेवाईकांचे दुःख मोठे आहे. या अपघाताची खोलात जाऊन चौकशी होईलच. या दुर्घटनेस जबाबदार असेल तर त्याची गय केली जाणार नाही, पण या दुर्दैवी घटनेचे राजकारणही कुणी करू नये. संपूर्ण महाराष्ट्रावर हा आघात आहे. नाशिकच्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न आहे!” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र शोकमग्न आहे!
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे pic.twitter.com/l4cBfMOxEO
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 21, 2021
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.
घटनेची उच्चस्तरी चौकशी
मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. मात्र, सरकारने या घटनेची गंभीर नोंद घेतली आहे.
मुख्यमंत्र्यंनी पुढे म्हटले आहे की, नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.