
महाराष्ट्राला कोरोना विषाणू (Coronavirus) संकटकाळात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (Oxygen) वाहून आणण्यासाठी 7 मोठे टँकर घेऊन जाणारी, देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ (Oxygen Express) आज रवाना करण्यात आली. रेल्वेवाहतुकीमार्गे जलदगतीने ऑक्सिजनची वाहतूक व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाकडे केली होती. त्याला रेल्वेने प्रतिसाद देताच राज्याने जलदगतीने हालचाली करुन आज पहिली रेल्वे रवाना केली. परिवहनमंत्री अनिल परब यांनी या एक्स्प्रेसला हिरवा दिवा दाखवून रवाना केले.
या एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या पाच दिवसात एकशे दहा मे. टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला होणार आहे. यापुढील काळात प्राणवायूच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणे शक्य होणार आहे. कळंबोली येथून विशाखापट्टणमकडे ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविणे अधिक व्यवहार्य असल्याने दोन दिवसात येथील प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण करण्यात आले; आणि आज प्रत्यक्ष रिकामे टँकर सपाट वॅगनवर ‘रोल ऑन-रोल ऑफ’ पद्धतीने चढवून सायंकाळी 7 वा. च्या दरम्यान ऑक्सिजन एक्स्प्रेसला रवानाही करण्यात आले. हे प्रत्येकी 16 मे. टन. द्रवरुप ऑक्सिजन वाहतुकीची क्षमता असलेले विशेष टँकर आहेत. (हेही वाचा: भारतामध्ये 1 मे पासून 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा व्यक्तीला मिळणार कोरोना विषाणू लस; केंद्र सरकारचा मोठा निर्णय)
नेहमीच्या पुणे-सिकंदराबाद- विजयवाडा रेल्वेमार्गावर पुणे दरम्यान बोगदे असल्यामुळे ओव्हरहेड वायरची उंची तुलनेत कमी होत असल्याने या मार्गावरुन ऑक्सिजनचे टँकर वाहून नेणे शक्य नव्हते. त्यामुळे तुलनेत लांबचा असला तरी व्यवहार्य असा सूरत- नंदूरबार- जळगाव- नागपूर असा लोहमार्ग निवडण्यात आला आहे. दरम्यान या एक्स्प्रेसला सिग्नल्सचा कमीत कमी अडथळा येईल अशा पद्धतीने ‘ग्रीन कॉरिडॉर’ही तयार करण्यात आला असून, केवळ दीड दिवसात ती विशाखापट्टणम येथे पोहोचेल. तेथील ‘राष्ट्रीय इस्पात लि.’ या कंपनीतून दीड-दोन दिवसात द्रवरुप प्राणवायु भरुन टँकर लगेच पुन: महाराष्ट्राकडे रवाना होतील. अशा पद्धतीने येत्या पाच दिवसाच्या आत सुमारे 110 मे. टन ऑक्सिजन राज्याला रेल्वेवाहतुकीद्वारे प्राप्त होईल.