देशात 1 मेपासून सुरु होणाऱ्या कोरोना विषाणू (Coronavirus) लसीकरणाच्या (Vaccination) तिसऱ्या टप्प्यासाठी केंद्र सरकारने लसीकरण धोरण थोडेसे लवचिक केले आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणात जास्तीत जास्त लोकांना लस दिली जाणार आहे, यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी देशात कोरोना लसीचे उत्पादन वाढविण्यात येणार आहे, तसेच लसीकरण मोहिमेसाठी परदेशी कंपन्यांचीही मदत घेतली जाणार आहे. आज पीएम नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
आता लस उत्पादक आपली निम्मी लस आधी केंद्र सरकारला पुरवतील व उरलेली निम्मी लस राज्य सरकार किंवा ओपन मार्केटमध्ये देऊ शकतील. गरज भासल्यास उत्पादकांकडून थेट लस मागविण्याचा अधिकारही राज्य सरकारांना असणार आहे. भारत सरकार, सक्रिय कोविड प्रकरणांची संख्या लक्षात घेता राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना लस वाटप करेल. या निकषात लस नष्ट होण्याचाही विचार केला जाईल. याआधी सर्व विरोधी पक्ष आणि तज्ज्ञ गेल्या कित्येक दिवसांपासून देशातील युवा पिढीला लस देण्याची मागणी करत होते. आता सरकारने म्हटले आहे की, 1 मेपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होईल, ज्यामध्ये 18 वर्षांवरील सर्वांना ही लस दिली जाईल. आतापर्यंत फक्त 45 वर्षांवरील लोकांनाच कोरोना लस दिली जात होती. (हेही वाचा: देशात फक्त 37 टक्केच फ्रंटलाइन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाले Coronavirus Vaccine चे दोन्ही डोस; अजूनही 91 लाख लोक दुसऱ्या डोसपासून वंचित)
Govt of India announces liberalised & accelerated Phase 3 strategy of COVID-19 vaccination from May 1; everyone above the age of 18 to be eligible to get vaccine pic.twitter.com/7G3WbgTDy8
— ANI (@ANI) April 19, 2021
बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, जास्तीत जास्त भारतीयांना कमीत कमी वेळात कोरोनाची लस मिळावी यासाठी सरकार एका वर्षापेक्षा अधिक काळ प्रयत्न करत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून आता देशातील युवकांना लस दिली जाणार आहे. महत्वाचे म्हणजे रशियन लस स्पुतनिक व्ही देखील आता भारतात तयार केली जाणार आहे. दरम्यान, कोविड-19 ची साथ छोट्या शहरांमध्येही झपाट्याने पसरत असल्याचे डॉक्टर आणि औषध कंपन्यांशी झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. अशा ठिकाणी संसाधने अपग्रेड करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. कोविड-19 वरील अफवांविषयी लोकांना जागरूक करण्यास त्यांनी डॉक्टरांना सांगितले.