महाराष्ट्र पर्यटनावर आधारित नवीन घोषवाक्य निर्मितीसाठी 'महा टूरिझम' मार्फत महा टॅगलाईन स्पर्धचे आयोजन
Maha Tagline Competition (PC - Twitter)

महाराष्ट्र पर्यटनावर आधारित नवीन घोषवाक्य निर्मितीसाठी 'महा टूरिझम' (Maha Tourism) मार्फत महा टॅगलाईन स्पर्धचे (#MahaTaglineContest) आयोजन करण्यात आले आहे. देशातील सर्व घटकांसाठी खुल्या असणाऱ्या स्पर्धेची 12 जुलै ही अंतिम मुदत असणार आहे. या स्पर्धेत राज्यातील व देशातील कलाकार, तरुण, विद्यार्थी यांसह सर्व घटक सहभागी होऊ शकतात. त्यांच्या कल्पना व आधुनिक ज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र पर्यटनाचे घोषवाक्य तयार करण्याचा पर्यटन संचालनालयाचा मानस आहे. यासाठी इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका maharashtratourismcontest@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात.

दरम्यान, विजेत्या स्पर्धकांना पर्यटन संचालनालयाद्वारे प्रशस्तीपत्रक आणि रोख रक्कम 10 हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहेत. स्पर्धेविषयक सविस्तर अटी व नियम जाणून घेण्यासाठी इच्छूकांनी फेसबूकवर https://bit.ly/2YY7n0N तर इन्स्टाग्रामवर https://bit.ly/2C2qhup या लिंकवर क्लिक करावे. या स्पर्धेत देशातील तसेच राज्यातील तरुणांनी, कलाकारांनी सहभाग घ्यावा, असं आवाहन पर्यटन संचालयालयाने केलं आहे. (हेही वाचा - महाराष्ट्र: Mahajobs पोर्टलवर उमेदवारांना रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी Domicile Certificate सादर करणे अनिवार्य असणार, सुभाष देसाई यांची माहिती)

सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे पर्यटन संचालनालयाने आगामी काळात समाज माध्यमांचा वापर करून राज्यातील पर्यटनस्थळांची प्रसिद्धी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील पर्यटन क्षमता विचारात घेऊन पर्यटन संचालनालय हे गेली काही वर्षे आपल्या जाहिरातीमध्ये 'महाराष्ट्र अनलिमिटेड' या घोषवाक्याचा वापर करीत आहे. परंतु, हे घोषवाक्य जुने असल्यामुळे पर्यटन संचालनालयाने भविष्यातील प्रसिद्धी मोहिमेसाठी नवीन घोषवाक्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवा, असं आवाहनदेखील पर्यटन संचालनालयाने केलं आहे.