'मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठुरायाकडे साकडे का घातले?' राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या राम मंदिरावरील टीकेला विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांचे प्रत्युत्तर
Sharad Pawar And Pravin Darekar (Photo Credit: PTI IANS)

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून केलेल्या विधानानंतर भाजपचे अनेक नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. “आम्हाला वाटते की कोरोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटते की मंदिर बांधून करोना जाईल”,असा टोला अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी मोदी सरकारला सोलापूर येथील दौऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत लगावला होता. शरद पवार यांनी केलेल्या टिकेला विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जर मंदिर बांधून करोना जाणार नसेल, तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी कोरोना नष्ट होण्याचे साकड का घातले? असा सवाल प्रविण दरेकर यांनी शरद पवार यांना विचारला आहे.

राम मंदिराच्या काम लवकरच सुरू होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्ट रोजी मंदिराच्या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे. यासाठीसाठी दोन तारखाही निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे राम मंदिराच्या भूमिपूजनाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. याविषयी बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला होता. शरद पवार यांनी केलेल्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांना पूर्ण भान आहे की, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे व नाही. देशातील कोरोनोचा प्रादुर्भाव संपविण्यासाठी सर्वाधिक उपाययोजना मोदी हे करत आहेत. हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. मंदिर बांधून कोरोना जाणार नाही याचे निश्चित भान त्यांना आहे, परंतु आपल्या देव दैवतांचा आशिर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. जर मंदिर बांधून व देवाची उपासना करुन कोरोना जाणार नसेल, तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्रातील नव्हे, तर देशभरातील कोरोना जाऊ दे असे साकडे का घातले? त्याचे उत्तर आपल्याकडे आहे काय? असा सवाल दरेकर यांनी पवार यांना केला आहे. हे देखीला वाचा- Ayodhya Ram Mandir: 'राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही' राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

याआधी भाजपाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनीही शरद पवारांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. “हो ना… तीन लाख रूग्ण व 11 हजार मृत्यू होऊनही घराबाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांमुळे कोरोना बरा होणार आहे!, रूग्णांची हेळसांड व रूग्णालये लुटत असताना भांडणाऱ्या तिघाडी सरकारमुळे बरा होणार आहे!!, गरीबांसाठी एकही रूपयांची मदत जाहीर न केलेल्या नेतृत्वहीन सरकारमुळे बरा होणार आहे!!!” अशा अशयाची त्यांनी फेसबूक पोस्ट केली आहे.