मुंबईच्या तलावामध्ये केवळ 5% पाणीसाठा; पाणी जपून वापरण्याचं BMC चं आवाहन
Water Crisis | (Photo Credit: PTI)

यंदा जून महिना सरत आला तरीही मुंबईमध्ये पाऊस बसरला नाही. त्यामुळे एकीकडे घामाने तर दुसरीकडे पाणी टंचाईच्या भीतीने मुंबईकर त्रस्त आहेत. सध्या मुंबईला पुरवठा करणार्‍या तलावांमध्ये केवळ पुढील 20 दिवस पुरेल इतकेच पाणी आहे. भातसा आणि अप्पर वैतरणा या सरकारी तलावांतून मुंबईकरांना राखीव पाणी साठ्यामधून पुरवठा होत आहे. त्यामुळे आता पालिकेने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे.

15 नोव्हेंबर 2018 पासून मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू केली आहे. मुंबईला सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. त्यापैकी मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, तुळशी आणि विहार या धरणांमध्ये 73 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. भातसा आणि अप्पर वैतरणा या धरणांमध्ये सुमारे अडीच हजार दशलक्ष लिटर राखीव पाणी आहे.

मुंबईमध्ये मान्सून दाखल झाला आहे. मात्र तो अद्याप बरसला नाही. येत्या 48 तासामध्ये मुंबईसह ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.