Ganeshotsav 2020: कोविड-19 संकटामुळे यंदा केवळ 300 गणपती मंडळांचे परवानगीसाठी BMC कडे अर्ज
Ganpati Utsav (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे यंदा केवळ 300 सार्वजनिक गणपती मंडळांनी मुंबई महानगरपालिकेकडे (Brihanmumbai Municipal Corporation) मंडप उभारणीसाठी परवानगी मागितली आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त मंडप उभारणी करीता परवानगी मागण्यासाठी 3000 अर्ज येतात. यंदा कोविड-19 संकटामुळे 1500 अर्ज कमी झाले आहेत. गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) अवघा एक महिना उरला आहे. गणेश उत्सवाची लगबग महिन्याभर आधीच सुरु होते. मात्र यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहावर पाणी फिरले आहे. (कोविड-19 संकटाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनासाठी दक्षिण मुंबई मध्ये 5 अतिरिक्त कृत्रिम तलावांची सोय; पहा कोठे असतील 'ही' तलावं)

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. दरम्यान, काही गणेशोत्सव मंडळांनी तर गणेशोत्सव साजरा न करता कोविड-19 च्या कठीण काळात आरोग्योत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यात मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाच्या देखील समावेश आहे.

तर सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवासाठी सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यात गणेशोत्सव मंडळांसाठी गणपतीची मुर्ती 4 फूट आणि घरगुती गणेशाची मुर्ती 2 फुटापर्यंत असावी हा महत्त्वाचा नियम आहे. तसंच गणेशाचे आगमन आणि विसर्जनावेळी गर्दी करु नये, मिरवणूक काढू नये असे देखील नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गणपती विसर्जनासाठी BMC कडून 5 अतिरिक्त कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली आहे.

दरम्यान कुटुंबिय, मित्रमंडळी यांना भेटून सण साजरा करणे शक्य होणार नाही. तसंच कोकणवासियांसाठी महत्त्वाचा असणारा सण गणेशोत्सव या निमित्ताने यंदा गावी जाण्यावरही बंधने आली आहेत. कोविड-19 संकटाचे सावट यंदा अनेक सणांवर होते. त्यामुळे गुढीपाडव्यापासून ते अगदी गणेशोत्सवापर्यंत सर्वच सणांना अगदी साधे स्वरुप प्राप्त झाले.