चंद्रपूर जंगलात वाघाने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू तर अस्वल हल्ल्यात दोनजण जखमी
Tiger | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

राज्यातील चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यामध्ये दोन भयानक घटना घडल्या आहेत. एका घटनेत वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा बळी गेला असून दुसऱ्या घटनेत अस्वल हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती चंद्रपूर जिल्ह्यातील जंगल अधिकाऱ्यांनी आज दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील सेंट्रल चंदा डिव्हिजनच्या (Central Chanda Division) चेक अस्था पोंभुर्णा जंगलामध्ये (Pombhurna Forest) बुधवारी रात्री वाघाने एका व्यक्तीवर हल्ला केला, अशी माहिती चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रविण यांनी दिली.

या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव पुरुषोत्तम मढवी असे आहे. बुधवारी रात्री जंगलातून काही गवत आणण्यासाठी गेले असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. गुरुवारी सकाळी मढवी यांच्या कुटुंबियांना त्यांचा मृतदेह जंगलात सापडला. मढवी हे चंद्रपूर मधील पोंभुर्णा तहसीलचे रहिवासी होते. (यवतमाळ येथे 60 वर्षीय महिलेचा बळी घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश)

दुसऱ्या घटनेत एका जंगली अस्वलाच्या हल्ल्यात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी चमनजेट्टी येथे घडली. या हल्ल्यामध्ये 30 वर्षीय सुनील लेंगुरे आणि 35 वर्षीय महादेव गुडेट्टीवार हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचार सुरु आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिला आहे. (चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू)

वाघ हल्ल्यात मृत्यू झाल्याची किंवा जखमी झाल्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वी अशा प्रकारच्या अनेक घटना देशाच्या विविध भागातून समोर आल्या आहेत.