देशात कोरोनाच्या नवीन प्रकाराचा, ‘ओमायक्रॉन’चा (Omicron) प्रादुर्भाव वाढत असलेला दिसत आहे. रविवारी सकाळपर्यंत देशात 5 ओमायक्रॉन रुग्ण होते, मात्र आता संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रात या नव्या व्हेरिएंटचे आणखी 7 रुग्ण आढळल्याने देशातील एकूण रुग्णसंख्या 12 झाली आहे. राज्यात ‘ओमायक्रॉन’ची प्रकरणे अचानक वाढत असताना दिसत आहेत. महाराष्ट्रात शनिवारी पहिला रुग्ण आढळला होता. आता महाराष्ट्रात कोरोना 'ओमायक्रॉन’ प्रकाराचे एकूण 8 रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाने रविवारी याबाबत माहिती दिली.
याआधी शनिवारी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात ‘ओमायक्रॉन’ कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळून आला होता. महाराष्ट्रात या प्रकाराची लागण झालेली ही पहिली आणि देशातील चौथी घटना होती. पण आता देशात एकूण 12 प्रकरणे समोर आली आहेत.
Seven more people tested positive for the #Omicron variant of COVID19 in Maharashtra. Total 8 cases of Omicron variant reported in Maharashtra so far: State Public Health Dept
— ANI (@ANI) December 5, 2021
महाराष्ट्रात आढळलेल्या 7 नवीन रुग्णांबद्दल सांगायचे तर, 44 वर्षीय महिला जी भारतीय वंशाची नायजेरियाची नागरिक, तिच्या 12 आणि 18 वर्षांच्या दोन मुलींसह 24 नोव्हेंबर रोजी पुण्याजवळील पिंपरी चिंचवडमध्ये तिच्या भावाला भेटायला आली होती. तिघींच्या जीनोम सिक्वेन्सिंग रिपोर्टमध्ये या तिघींना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे आढळले. त्यानंतर महिलेचा 45 वर्षीय भाऊ आणि त्याच्या अडीच आणि 7 वर्षांच्या मुलींनाही ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
या 6 लोकांपैकी 3 जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, त्यामुळे त्यांनी कोणतीही कोरोनाची लस घेतली नव्हती. यापैकी केवळ नायजेरियातून परतलेल्या महिलेमध्ये सौम्य लक्षणे आढळली, तर उर्वरित 5 जणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. या सर्वांवर पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. (हेही वाचा: तांझानिया येथून आलेल्या व्यक्तीचे COVID19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्याचे सॅम्पल Genom Seqencing साठी पाठवल्याची ंमहापौर किशोरी पेडणकेर यांची माहिती)
सातवे प्रकरण पुण्यातील आहे. 47 वर्षीय तरुण 18 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर या कालावधीत फिनलंडमध्ये होता. 29 तारखेला सौम्य ताप आल्यानंतर त्याने स्वतःची आरटीसीपीआर चाचणी केली असता त्याचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या व्यक्तीने कोविशील्डचे दोन्ही डोस घेतले होते. सध्या या व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे नसून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.