Varsha Gaikwad on SSC-HSC Offline Exams: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन परीक्षा हा सुरक्षित पर्याय - वर्षा गायकवाड
Varsha Gaikwad (PC - Twitter)

Varsha Gaikwad on SSC-HSC Offline Exams: इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाईनचं होणार असल्याची महत्वाची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली शनिवारी दिली आहे. तसेच दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन परीक्षा (Offline Exams) हा सुरक्षित पर्याय असल्याचंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षा 29 एप्रिल ते 21 मे दरम्यान आणि बारावीच्या परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान घेण्यात येणार आहेत. याशिवाय कोविड संसर्गामुळे अथवा कंटेन्मेंट झोनच्या निर्बंधामुळे परीक्षेस अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा जून महिन्यात घेण्यात येईल. शाळेकडून या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला दिली जाईल, असंही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे. राज्याच्या दुर्गम भागात ऑनलाइन परीक्षा घेणे कठीण आहे. त्यामुळे ऑफलाईन परीक्षेचा पर्याय योग्य आहे. मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करण्यासाठी विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट हे प्रवास पास म्हणून ग्राह्य धरण्यात यावे. यासाठीचा प्रस्ताव आम्ही सरकारकडे पाठवत आहोत, असंही वर्षा गायकवाड यांनी नमूद केलं आहे.

बोर्डाच्या परीक्षेदरम्यान पर्यवेक्षण करणारे शिक्षक आणि बोर्डाचे अधिकारी यांच्या सुरक्षेची संपूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे. त्याप्रमाणे त्यांना Frontline Workers समजून प्राधान्यक्रमाने लसीकरण करण्याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करण्यात आल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसेच कोविडच्या नियमांचे पालन करायचे असल्यामुळे विद्यार्थ्यांनी किमान एक तास आधीच परीक्षा केंद्रावर दाखल व्हावे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका 10 मिनिटे आधीच देण्यात येतील, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. (वाचा - Covid-19 Vaccine चे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन होणे बंधनकारक नाही- BMC)

दरम्यान, सर्व परीक्षा केंद्रांवर विलगीकरण कक्षाची व्यवस्था असेल. परीक्षेदरम्यान एखाद्या विद्यार्थ्यात कोविड लक्षणे आढळल्यास इच्छुक विद्यार्थ्याला उर्वरित प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी त्याची विलगीकरण कक्षात बैठक व्यवस्था केली जाईल.परीक्षा केंद्र नजिकचे शासकीय आरोग्य केंद्र आवश्यक मदत पुरवेल. कोविड संसर्गबाधित विद्यार्थ्यांसाठी होणाऱ्या विशेष परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, ही परीक्षा शहरी भागांमध्ये निवडक परीक्षा केंद्रांवर व ग्रामीण भागात तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी होईल. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना परीक्षेच्या प्रत्येक घड्याळी तासासाठी 20 मिनिटांची वेळ वाढवून देण्यात येईल, असंही वर्षा गायकवाड यांनी नमूद केलं आहे.

दहावी/बारावी ची लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांच्या शाळा किंवा महाविद्यालयात होईल. या वर्षी विद्यार्थ्यांचा लेखन सराव कमी झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन परीक्षेची वेळ वाढवण्यात आली आहे. 80 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी 30 मिनिटे, तर 40-50 गुणांची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 15 मिनिटे अधिक वेळ देण्यात येणार आहे. कोविडची परिस्थिती पाहता यावर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेणे कठीण असल्याने विद्यार्थ्यांना सवलत देणे गरजेचे आहे. त्यामुळे दहावीच्या विज्ञान विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षांऐवजी विद्यार्थ्यांना अंतर्गत असाईनमेंट देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचंही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.

याशिवाय अंतर्गत असाईनमेंट लेखी परीक्षेच्या नंतर (21 मे ते 10 जून) दरम्यान सादर करावे लागणार आहेत. याबाबतचे नियोजन शाळेकडून करण्यात येणार आहे. या दरम्यान विद्यार्थी आजारी असल्यास 15 दिवसांची वाढीव वेळ देण्यात येणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्यादृष्टीने बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा महत्त्वाच्या आहेत.या परीक्षा रद्द करण्यात आल्या नाहीत. मात्र,प्रात्यक्षिक प्रयोगांची संख्या या वर्षासाठी पाच ते सहा इतकीच मर्यादित करण्यात आली आहे. याबाबत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना अधिकचा तपशील देण्यात येईल. प्रात्यक्षिक परीक्षा व गृहपाठ जमा करण्याची प्रक्रिया ही लेखी परीक्षा संपल्यानंतर (22 मे ते 10 जून) होईल. या परीक्षेसाठी अंतर्गत व बहिस्थ परीक्षक संबंधित कनिष्ठ महाविद्यालयातूनच देण्यात येतील. कठोर सुरक्षा नियमांतर्गत परीक्षा व गृहपाठ जमा प्रक्रिया बॅचप्रमाणे पूर्ण केली जाईल. प्रात्यक्षिक परीक्षा अथवा प्रात्यक्षिक वही सादर करण्याच्या कालावधीत एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यास किंवा कोरोना विषयक परिस्थितीमुळे तो गैरहजर असल्यास त्याला 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल, असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.