ओबीसी आरक्षण (OBC Reservatio) मुद्द्यावरुन बोलताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राजकीय संन्यास घेण्याची भाषा केली. त्यांच्या या विधानावरुन राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही फडणवीस यांच्या याविधानावरुन प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण संन्यास घेऊ नये. मी त्यांना राजकीय सन्यास घेऊ देणार नाही. हवं तर मी त्यांची भेट घेईन. त्यांची महाराष्ट्र आणि जनतेला आवश्यकता आहे. त्यांनी फकीर होण्याची भाषा करणे योग्य नव्हे, असा चिमटा काढत राऊत यांनी मिष्कील प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना म्हटले आहे की, राज्याला आणि देशाला नेतृत्व देऊ शकणारी काही मोजकी नेतृत्व आहेत. देवेंद्र फडणवीस हे त्यांमध्येच येतात. त्यामुळे त्यांनी राजकारण संन्यास घेण्याची भाषा करु नये. नव्या दमाच्या तरुण नेतृत्वाची देशाला गरज आहे. देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्तरावर तळपू शकतात, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- BJP Chakka Jam Aandolan: ओबीसी राजकीय आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नागपूरात घेतलं ताब्यात
सामना संपादकीयात काय म्हटले?
शिवसेना मुखपत्र दैनिक सामना संपादकीयातूनही देवेंद्र फडणवीस यांच्या संन्यासाबाबतच्या विधानावरुन जोरदार समाचार घेण्यात आला आहे. सामना संपादकीयात म्हटले आहे की, ''आज रस्त्यांवर गर्दी जमवून आदळआपट करून काय साध्य करणार? भाजपा व त्यांचे पुढारी विद्वान आहेत, कायदेबाज आहेत. त्यामुळे सरकारच्याच बरोबरीने ओबीसी आरक्षणाची लढाई त्यांनी सुरूच ठेवावी व ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यास हातभार लावावा. आम्हाला चिंता मराठा आणि ओबीसी आरक्षणाची आहेच, पण फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यास घेण्याच्या घोषणेचीदेखील आहे. फडणवीसांनी असा त्रागा करून घेऊ नये. सर्वकाही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल. संन्यास घेतील त्यांचे दुष्मन!''
काय आहे प्रकरण?
ओबीसी आरक्षण मुद्द्यावरुन नागपूर येथे भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. या आंदोलनात बोलताना देवेंद्र फडणीस यांनी म्हटले होते की, आमच्या हातात सत्ता द्या. चार महिन्यांत आरक्षण मिळवून देईन. आरक्षण मिळवून नाही दिले तर राजकारणातून सन्यास घेईन. देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यामुळे राज्याच्या वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली. अनेकांनी या वक्तव्याची खिल्ली उडवली. तर अनेकांनी त्यावर टीका केली.