देशातील कोरोना विषाणू (Coronavirus) बाधित रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस वाढतच आहेत. भारतातील जवळजवळ प्रत्येक राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. लोकांचे घराबाहेर पडणे बंद झाले आहे मात्र तरी या विषाणूची भीती अनेकांच्या मनात आहे. अशा परिस्थितीत कोरोना टेस्टसाठी नेमके कोठे जायचे? याबद्दल लोक साशंक आहेत. मात्र लवकरच मुंबईतील (Mumbai) ज्या लोकांना आपल्याला कोरोनाची लक्षणे आहे असे वाटत असेल, ते लोक घरीच कोरोना टेस्ट करु शकणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने सोमवारी सांगितले की, येत्या दोन दिवसांत मुंबईत ज्या लोकांना कोरोना विषाणूची लक्षणे आहेत त्यांची घरीच कोरोना चाचणी घेता येईल.
यासाठी बीएमसी 48 तासांमध्ये एक हेल्पलाइन सुरू करत आहे, जिथे या विषाणूचा संशय असलेले रुग्ण चाचणीसाठी आपले नाव बुक करू शकतील. त्यानंतर, खासगी लॅबचे प्रतिनिधी रूग्णाच्या घरी जाऊन त्याची तपासणी करतील. बीएमसीने एका निवेदनात म्हटले आहे की- ‘होम टेस्टिंग सुविधा हेल्पलाइनद्वारे सुरू होत आहेत. ही सुविधा येत्या 48 तासात सुरू होईल. सध्या ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत ते होम क्वारंटाईन ट्रॅव्हल्सना कॉल करतात आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) नोंदणीकृत खासगी लॅबमधून त्यांची चाचणी करण्यात येते.’ (हेही वाचा: दिलासादायक वृत्त! मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोना व्हायरस बाधित 12 रुग्णांची चाचणी निगेटीव्ह, उपचारानंतर प्रकृती सुधारली)
बीएमसीने सांगितले की, त्यांना घरगुती तपासणीच्या प्रक्रियेसंदर्भात इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून मार्गदर्शक तत्त्वे हवे आहेत. लोकांनी शक्य तितके घरीच राहावे यासाठी बीएमसी ही घरातून होणारी चाचणी सुरु करत आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले- ‘एकदा का हेल्पलाईन सुरू झाली की, डॉक्टरांना कॉलवर रुग्णांची पार्श्वभूमी व इतर गोष्टी समजू शकतील आणि त्या आधारे रूग्णांचे वर्गीकरण करणे सुकर होईल. त्यानंतर, आवश्यक वाटल्यास खासगी लॅब प्रतिनिधी घरी जाऊन तपासणी करतील.’