Pune Crime: पुण्यातील खराडी परिसरात कुख्यात गुंड शैलेश घाडगे याची दगडाने ठेचून हत्या
Representational Image | (Photo Credits: PTI)

Pune Crime: पुणे शहरात (Pune City) कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातचं शहरातील गुन्हेरागीच्या घटनांमध्येदेखील वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहरातील खराडी परिसरात (Kharadi Area) कुख्यात गुंडाची दगडांने ठेचून हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शैलेश घाडगे (Shailesh Ghadge) असं या मृत गुंडाचं नाव आहे. आज पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण खराडी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, खराडीतील नैवेद्यम हॉटेल शेजारी असणाऱ्या मैदानाजवळ एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पाोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना मृतदेहाची ओळख पटली. हा मृतदेह कुख्यात गुंड शैलेश घाडगेचा होता. त्यानंतर पोलिसांनी शैलेशच्या कुटुंबियांना यासंदर्भात माहिती दिली. शैलेशच्या कुटुंबियांनी या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. (हेही वाचा - मुंबई: कोंबडीचे यकृत खरेदी करण्याऐवजी चॉकलेटवर 10 रुपये खर्च केल्याने महिलेने 6 वर्षाच्या भाचीच्या खासगी भागावर दिले गरम चमच्याने चटके)

दरम्यान, शैलेश घाडगे याच्या हत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु, पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शैलेश हा शहरातील कुख्यात गुंड होता. त्यावर यापूर्वी अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. (हेही वाचा - धक्कादायक! पुण्यात तरुणींनी Nude Video Calls रेकॉर्ड करुन 8 पुरुषांना केले ब्लॅकमेल)

गेल्या आठवड्यात नागपूर शहरात कुख्यात बाल्या ऊर्फ किशोर बिनेकर याची धारदार शस्त्रांनी वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे बिनेकर याची हत्या दिवसा करण्यात आली होती. याशिवाय नागपूरमध्ये जून महिन्यात तडीपार गुंडनितेश मूलचंद पटले याची हत्या करण्यात आली होती. गुंडाच्या भरदिवसा होणाऱ्या हत्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.