Malad Wall Collapse (Photo Credit : Twitter)

Malad Wall Collapse : जोरदार पावसामुळे 2 जुलै 2019 रोजी मुंबई येथील मालाड परिसरातील महापालिकेच्या जलाशयाची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना (Malad Wall Collapse) घडली होती. या अपघातामध्ये सुमारे 30 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेकजण जखमी झाले होते. परंतु, आता या दुर्घटनेत कोणीही दोषी नसल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. यासंबंधी 9 जणांच्या तांत्रिक चौकशी समितीने अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालात कोणालाही दोषी धरण्यात आलेले नाही. या दुर्घटनेट संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे.

2 जुलै रोजी मुंबई मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मालाडमधील राणी सती मार्गावर पालिकेच्या जलाशयाची 20 फूट उंच भिंत आजूबाजूच्या झोपड्यांवर कोसळली होती. या दुर्घटनेत 75 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. या अपघातामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. 2 वर्षांपूर्वीच ही बांधली होती. परंतु, दुर्घटनेनंतर भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची बाब समोर आली. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार समितीने आपला अहवाल सादर केला आहे. मात्र, यातील सर्व अधिकारी आणि कंत्राटदार निर्दोष असल्याचे असल्याचे सांगण्यात आले आहे. (हेही वाचा - Malad Wall Collapse: मालाड दुर्घटनेतील मृतांची संख्या 27 वर पोहचली; निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे घडला अपघात)

या अहवालात भिंतीमध्ये पावसाचे पाणी साचले आणि या पाण्याचा दबाव वाढून भिंत कोसळली, असे सांगण्यात आलं आहे. तसेच पाणी वाहून नेण्यासाठी मोठी गटारं नसल्याने हे पाणी भिंतीत साचल्याचा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.  2350 मीटर लांबीची आरसीसीची भिंत ओमकार इंजिनीअर अॅण्ड क्रॉन्ट्रॅक्टर कंपनीने बांधली होती.