Malad Wall Collapse (Photo Credit : Twitter)

कोकणात तिवरे धरण कोसळल्याची घटना, पुण्यात कोंडवा परिसरात इमारतीची भिंत कोसळल्याची घटना ताजी असताना मुंबई येथील मालाड परिसरातील महापालिकेच्या जलाशयाची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना (Malad Wall Collapse) घडली होती. आता या अपघातातील मृतांची संख्या 27 वर पोहचली आहे. 2 जुलै रोजी मुंबई मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे,  मालाडमधील राणी सती मार्गावर पालिकेच्या जलाशयाची 20 फूट उंच भिंत आजूबाजूच्या झोपडय़ांवर कोसळली होती. या दुर्घटनेत 75 पेक्षा जत लोक जखमी झाले होते.

रात्री दोन वाजता ही घटना घडली होती. त्यानंतर उमटलेल्या प्रतिक्रियांमुळे या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले गेले होते. दीड वर्षांपूर्वी, तब्बल 21 कोट रुपये खर्च करून ही भिंत बांधण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे पाण्याचा दाब वाढल्याने भिंत कोसळल्याचे प्राथमिक चौकशीत दिसून आले होते. मात्र या भिंतीच्या बांधकामासाठी वापरलेला माल दुय्यम दजार्चा होता अशी तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. (हेही वाचा: 'खेकड्यांनी भोक पाडल्यानं तिवरे धरण फुटलं' जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांचे धक्कादायक विधान)

2350 मीटर लांबीची आरसीसीची भिंत ओमकार इंजिनीअर अॅण्ड क्रॉन्ट्रॅक्टर कंपनीने बांधली आहे. हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होते. या दरम्यान ओमकार कंपनी नालेसफाईच्या कामात दोषी आढळली असून, तिला दोन वर्षांपूर्वी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. मालाड भिंत अपघात प्रकरणी पालिकेने कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावली असून चौकशीसाठी समितीही नेमण्यात आली आहे. या घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना महापालिकेकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.