प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: PTI)

1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती (Helmet compulsion) सुरु झाली, आणि पुणेकरांचे धाबे दणाणले. आजपर्यंत डोक्यावर फक्त पगडी घातलेल्या पुणेकरांना हेल्मेट (Helmet) डोक्यावर घालायला सांगणे हा फार मोठा अपमान वाटला. ही सक्ती धुडकावून, याबाबत निदर्शने करूनही काही उपयोग झाला नाही. त्यानंतर प्रशासनाने ‘नो हेल्मेट’ बाबत दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. नुकताच पुण्यात एका वाहनचालकाकडून तब्बल 12,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नियम लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी हेल्मेट शिवाय गाडी चालवणाऱ्या तब्बल 7 हजार 490 जणांवर कारवाई करण्यात आली होती.

पुण्यातील फरासखाना परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. या वाहनचालकावर आधीच 27 चलनांची नोंद आहे. यामध्ये त्याने 23 वेळा हेल्मेटविना गाडी चालवल्याची नोंद आहे. काही दिवसांपूर्वीच ट्राफिक पोलिसांनी एका वाहनचालकाला हेल्मेट न वापरल्यामुळे  तब्बल 18 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला होता. (हेही वाचा: पुण्यात हेल्मेटसक्ती जोरात; 'नो हेल्मेट’चा दंड तब्बल 18,500, 37 वेळा विनाहेल्मेट)

सद्ध्या ट्राफिक पोलीस यांच्यासोबत सीसीटीव्हीदेखील हेल्मेटविना गाडी चालवणाऱ्या चालकांवर लक्ष ठेऊन आहेत. पोलिसांना एका चारचाकी वाहनचालकाने वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 24,200 रुपयांचा दंड वसूल केला होता, सीसीटीव्हीमुळे हा प्रकास निदर्शनास आला होता.