EVM Vs Ballot | (Photo credit: archived, edited, representative image)

भारतामध्ये होणाऱ्या निवडणुका खास करुन विधानसभा आणि लोकसभा ईव्हीएमवरती (Electronic Voting Machines) न घेता त्या बॅलेट पेपरवर (Ballot Paper) घेण्यात याव्या, अशी मागणी काँग्रेस आणि विरोधी पक्ष आक्रमकपणे करु लागले आहेत. महाराष्ट्रातही ही मागणी वाढत आहे. मारकडवाडी (Markadwadi) हे गाव ही मागणी करणारे राज्यातील पहिले होते. मात्र, आता सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील दुसरे गाव लक्ष्मी टाकळी (Lakshmi Takali Gram Panchayat) हे चक्क ईव्हीएमद्वारेच मतदान व्हावे असे म्हणत आहे. बॅलेट पेपरला तीव्र विरोध करत ईव्हीएमचे समर्थन करणारे पंढरपूर (Pandharpur News) तालुक्यातील हे राज्यातील पहिले गाव ठरले असून, या गावाने तसा ठरावही केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेत आहे. या गावात विधानसभा निवडणूक 2024 मध्ये ईव्हीएमद्वारे मतदान झाले. अर्थात संपूर्ण राज्यात आणि देशभरात अशाच पद्धतीने मतदान पार पडते आहे. दरम्यान, हे गाव माळशीरस विधानसभा मतदारसंघात येते. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे उमेदवार उत्तमराव जानकर निवडून आले आहेत. भाजप उमेदवार राम सातपुते यांचा त्यांनी पराभव केला आहे. दरम्यान, विजयी उमेदवार असूनही जानकरांनी बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याचे अवाहन केले आहे. या अवाहनास मारकडवाडी गावाने प्रतिसाद दिला. इतकेच नव्हे तर या गावाने तसे अभिरुप मतदानाचेही आयोजन केले. पण, प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे या गावातील बॅलेट पेपर मतदान होऊ शकले नाही. परिणामी हे गाव देशभर चर्चेत आले. (हेही वाचा, Markadwadi Markadwadi Ballot Paper Voting Suspended: मारकडवाडी येथील बॅलेट पेपर मतदान प्रक्रिया स्थगित, प्रशासनाच्या दबावामुळे गावकऱ्यांचा निर्णय)

दुसऱ्या बाजूला, नवनिर्वाचित विधानसभा आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांसारख्या काही भाजप आणि समर्थक नेत्यांनी ईव्हीएमचे जोरदार समर्थन केले आहे. त्यासाठी त्यांनी मारकडवाडी येथे राम सातपुते यांच्या उपस्थितीत एक सभाही घेतली. असे असले तरी याच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी या गावाने ईव्हीएमच्या बाजुने ठराव केला आहे. बॅलेट पेपरवर मतदान न घेता ते ईव्हीएमद्वारे घ्यावे यासाठी ठराव करणारे हे राज्यातील पहिलेच गाव ठरले आहे. त्यामुळे ईव्हीएम समर्थक आणि इव्हीएम विरोधाच्या लढ्यामध्ये सोलापूर जिल्हा केंद्रबिंदू ठरते की काय, असे बोलले जाऊ लागले आहे. (हेही वाचा, Markadwadi: 'राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या', उत्तमराव जानकर यांचे Sharad Pawar यांच्या उपस्थितीत मोठे वक्तव्य)

प्राप्त माहितीनुसार, लक्ष्मी टाकळी हे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात असलेल्या गावाने गुरुवारी म्हणजेच 12 डिसेंबर रोजी ईव्हीएमच्या समर्थनार्थ ठराव केला आहे. गावचे ग्रामपंचायत सरपंच संजय साठे यांच्या अध्यक्षतेखाली हा ठराव मंजूर झाला. या ठरावासाठी एकूण 17 ग्रामपंचायत सदस्यांपैकी 14 सदस्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ईव्हीएमच्या समर्थनार्थ सहमती दर्शवली. ग्रामसेवक खंडागळे यांनी सांगितले की, गावकरी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी ठरावाच्या बाजूने हात उंचाऊन हे समर्थन दिले.