मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर खातेवाटपावर अडलेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारची गाडी काहीशी पुढे सरकली खरी. पण सरकारमध्ये सर्वच काही अलबेल असल्याचे चित्र नाही. सत्ताधारी असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या आमदारांमध्ये जोरदार जुंपली आहे. आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सोशल मीडियावर एकमेकांवर जाहीर चिखलफेक सुरु केली केली आहे. दोघांकडून एकमेकांवर केली जाणारी टप्पणी व्यक्तीगत स्वरुपाची आहे. दोघांमधील वाद-प्रतिवाद पाहून राज्यातील राजकीय संस्कृती भलत्याच पातळीवर गेल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नितेश राणे यांनी नामोल्लेख करत आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''आत्ताच कुठेतरी वाचलं मिटकरी म्हणतो मी भाजपचा प्रचार करणार नाही. हा कोण आहे?? आमच्या कोकणात मिटकरी सारख्या लोकांना शिमग्यातला गोमू म्हणतात.
भलताच कॉन्फिडन्स असतो काही लोकांना.'' राणे यांचे हेच ट्विट कोट करुन रिट्विट करत अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''अबे तु नेमका कुणाचा प्रचार करणार ते ठरव आधी आणि गप राहायला शिक जरा.. तृतीयपंथीयांनी तुला तुझी लायकी दाखवली आहेच. कशाला वारंवर तोंड काळ करुन घेतोस?'' (हेही वाचा, Social Media Troll Eknath Shinde Faction: सासुमुळे वाटणी केली अन् सासुच वाट्याला आली!, अजित पवार यांना अर्थखाते मिळाल्यावर शिंदे गट ट्रोल)
अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेवरील आमदार आहेत. ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांसोर आपल्या पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडण्यावर मिटकरी यांचा भर राहिला आहे. खास करुन अजित पवार यांच्यावर झालेल्या टीकेला मिटकरी अधिक आक्रमक प्रत्युत्तर देतात.
ट्विट
अबे तु नेमका कुणाचा प्रचार करणार ते ठरव आधी आणि गप राहायला शिक जरा.. तृतीयपंथीयांनी तुला तुझी लायकी दाखवली आहेच. कशाला वारंवर तोंड काळ करुन घेतोस? https://t.co/VZD1GxjDHq
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 14, 2023
नितेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आहेत. ते कोकणातील एका विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून आले आहेत. सोशल मीडिया असो की प्रसारमाध्यमे यांवर पक्षाची आणि अलिकडी काही काळात खास करुन हिंदुत्त्ववादी भूमिका राणे आक्रमपणे मांडत आले आहेत. उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबीयांवर टीका करण्यात नितेश राणे विशेष अग्रभागी असतात.