कॉंग्रेस आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाबाबत एका अधिकाऱ्याला चिखलाची अंघोळ घालण्याचे धक्कादायक कृत्य केले होते. या घटनेनंतर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवून याचा निषेध केला होता. आता नितेश नारायण राणे यांनी कणकवली पोलिसांसमोर (Kankavali Police) आत्मसमर्पण केल्याचे वृत्त मिळत आहे. आयपीसी कलम 353, 342, 332, 324, 323, 120 (ए), 147, 143, 504, 506 अंतर्गत त्यांच्याविरुद्ध आणि त्यांच्या 40-50 समर्थकांविरुद्ध एफआयआरची नोंद करण्यात आली आहे.
Dikshit Gedam, SP, Sindhudurg: Nitesh Rane and two of his supporters have been arrested and search for other accused is on. They will be produced in court tomorrow https://t.co/arlggBoprg
— ANI (@ANI) July 4, 2019
मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने ट्राफिक वाढले आहे. त्यात निर्माण झालेले खड्डे बुजवण्यात प्रशासन टाळाटाळ करत आहे. याच मुद्द्यावर कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे आक्रमक झाले होते. त्यांनी याबाबत थेट आंदोलन करत, हायवे प्रकल्पाचे उप-अभियंता प्रकाश शेडेकर यांना चक्क चिखलाने अंघोळ घातली. यावेळी अभियंत्याला शिवीगाळ करत त्याला बांधून ठेवण्यात आले होते. (हेही वाचा: रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत नितेश राणे आक्रमक; अधिकाऱ्याला चोप देत घातली चिखलाची अंघोळ (Video))
या कृत्याचा नारायण राणे यांनीही निषेध केला आहे. ‘हे वर्तन पूर्णतः चुकीचे आहे. महामार्गाच्या मुद्द्यावर निषेध नोंदवणे योग्य आहे, परंतु नितेश आणि त्यांच्या समर्थकांद्वारे अशाप्रकारे हिंसा घडणे योग्य नाही. मी या गोष्टीचे समर्थन करत नाही,’ असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले होते. आता नितेश राणे आणि त्यांच्या दोन समर्थकांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून, उद्या त्यांना न्यायालयात सादर केले जाईल, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दीक्षित कुमार गेडाम यांनी दिली.