रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत नितेश राणे आक्रमक; अधिकाऱ्याला चोप देत घातली चिखलाची अंघोळ (Video)
नितेश राणे आक्रमक (Photo Credit : Twitter)

राज्यात सध्या पावसाने थैमान घातले आहे. त्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे पूर्ण न झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मुंबई – गोवा महामार्गावरदेखील (Mumbai-Goa Highway) अशीच परिस्थिती आहे. या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम चालू असल्याने ट्राफिक वाढले आहे. त्यात निर्माण झालेले खड्डे बुजवण्यात प्रशासन टाळाटाळ करत आहे. याच मुद्द्यावर कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आक्रमक झाले आहेत. त्यांनी याबाबत थेट आंदोलन करत, हायवे प्रकल्पाचे उप-अभियंता प्रकाश शेडेकर यांना चक्क चिखलाने अंघोळ घातली. सध्या या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील खराब रस्त्यांच्या कामामुळे हा प्रकार घडला. यावेळी अभियंत्याला शिवीगाळ करत त्याला बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर चिखलाचे पाणी ओतून, गुडघाभर पाण्यातून चालण्यास भाग पाडले. दरम्यान स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी या अधिकाऱ्याला चोप दिला असल्याचीही माहिती मिळत आहे. (हेही वाचा: आता मुंबई मधील खड्डे बुजणार 24 तासांत; फक्त पाठवावा लागेल फोटो, जाणून घ्या WhatsApp Number)

मुंबई – गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत, तसेच कणकवली येथील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आमदार नितेश राणे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र विनंती करूनही याबाबत कारवाई होत नसल्याचे पाहून नितेश राणे संतप्त झाले. गुरुवारी सकाळी थेट कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्याला उचलून आणून त्याचा अपमान करण्यास सुरुवात केली. अखेर 15 दिवसांच्या आता रस्त्याची ही समस्या सोडवावी, अशी तंबी देत अभियंता प्रकाश शेडेकर यांची मुक्तता करण्यात आली.