महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार यंदा कधी नव्हे तो इतका चर्चेत आला. अन्यथा यापूर्वी दिलेले गेलेले अपवाद वगळता बहुतांश महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रसारमाध्यमांतून येणाऱ्या वृत्तापुरतेच राहिले. त्याची यंदाइतकी चर्चा कधीच आणि तीसुद्धा इतक्या नकारात्मक पद्धतीने झाली नाही. यंदा निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यावेळी घडलेल्या दुर्घटनेने महाराष्ट्र हादरला. दरम्यान, या निमित्ताने ज्येष्ठ विचारवंत हरी नरके (Hari Narke) यांनी सांगितलेली ऐतिहासीक आठवण लक्ष वेधून घेत आहे. ही आठवण आहे दिवंगत अभिनेते निळू फूले (Nilu Phule) आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्याचर्चेतील.
विचारवंत हरी नरके यांनी ही आठवण फेसबूक पोस्टच्या माध्यमातून कथन केली आहे. हरी नरके सांगतात, एकदा ते (नरके) अभिनेते निळू फुले यांच्या घरी बसले होते. इतक्यात त्यांना राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा फोन आला. विलासराव देशमुख यांनी आपणास 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. आपण हा पुरस्कार स्वीकाराल का? अशी मान्यता घेण्यासाठी सवाल विचारला. यावर निळू फुले तत्काळ म्हणाले 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा इतके मी काहीच केले नाही. अहो, मी एक व्यावसायिक नट आहे. पोटापाण्यासाठी अभिनय करतो. मी जे काम करतो त्याचे रग्गड पैसे घेतो. त्यामुळे तसे मी काही केले नाही. तुम्हाला हा पुरस्कार द्यायचाच असेल तर तो डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना द्या. त्यांनी आदिवासी पाड्यांवर आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष काम केले आहे', असे निळू फुले यांनी सांगितले. विशेष म्हणजे पुढे हा पुरस्कार डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना जाहीरही झाला. (हेही वाचा, रुपेरी पडद्यामागील खलनायक जपत होता खऱ्या आयुष्यात सामाजिक वसा, जाणून घ्या निळूभाऊंच्या आयुष्याचे काही अजाण पैलू (See Photos))
विचारवंत हरी नरके यांची फेसबुक पोस्ट
२००४ साल असावे. मी निळुभाऊंकडे बसलो अस्ताना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा निळू फुले यांना फोन आला. ते म्हणाले, आमच्या शासनाने २००३ या वर्षीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी तुमची निवड केलेली आहे. तुमची संमती हवी.
निळूभाऊंनी त्यांचे आभार मानले आणि या पुरस्काराला पात्र ठरावा असा मी कोणताही पराक्रम केलेला नाही. मी एक व्यावसायिक अभिनेता आहे. पोटापाण्याची सोय म्हणून अभिनय करतो. त्याचे वट्ट मोजून पैसे घेतो. यात समाजासाठी, राज्यासाठी मी काहीही केलेले नाही.
मुळात तुम्ही आम्हा व्यावसायिक लोकांना हा पुरस्कार देणेच चूक आहे असे भाऊंनी
सीएमना सुनावले.
पुढे ते म्हणाले," तुम्हाला हा पुरस्कार द्यायचाच असला तर डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग यांना द्या. त्यांनी बालमृत्यू रोखण्यासाठी आदिवासी भागात, गडचिरोलीला सर्चच्या माध्यमातून मोठे काम केलेले आहे." भाऊंची ही शिफारस विलासरावांनी ताबडतोब मान्य केली.
२००३ सालचा महाराष्ट्र भूषण डॉ. बंग पतीपत्नी यांना दिला गेला.
कुठे निळूभाऊ नी कुठे निरुपणकार?
: प्रा. हरी नरके
या पोस्टवर भाऊंच्या कन्या गार्गी फुले लिहितात, "पण या सगळ्यामधे कौतुक माझ्या बाबाबरोबर विलासरावांचं पण वाटतं की त्यांनी बाबांचं ऐकलं.... किती मोठेपण दोघांचं आणि विश्वासपण!"
माझ्या या पोस्टला त्यावेळच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. धन्यवाद.
फेसबुक पोस्ट
हरी नरके यांची ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, विलासराव देशमुख यांचे कार्यकर्ते, चाहते आणि निळू फुले यांना मानणारे रसिकही या पोस्टवर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी हा किस्सा ऐकून कौतुक केले आहे.