Nilam Gorhe

विधान परिषदेच्या उपसभापती आणि ठाकरे गटाच्या महिला नेत्या नीलम गोऱ्हे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून नीलम गोऱ्हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, सुषमा अंधारेंच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे महिला आघाडीत नाराजी होती का? यासंदर्भात गेल्या काही महिन्यांपासून जोरदार चर्चा रंगली आहे. यावर नीलम गोऱ्हेंनी खोचक टिप्पणी केली. “आमच्या पक्षात नाराजी वगैरे कुठेच नसतं. नाराजी असली, तरी पक्षाचे नेते आले की सगळे नाराजी विसरत असतात. सटर-फटर लोकांमुळे नाराज होण्याची काही परिस्थिती नाहीये”, असं नीलम गोऱ्हे यावेळी म्हणाल्या. (हेही वाचा - MLC Neelam Gorhe Joins Shiv Sena: नीलम गोर्‍हे यांचा उद्धव ठाकरे गटाला रामराम करत Eknath Shinde, Devendra Fadnavis च्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश )

शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश करताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम करण्याचा मी निर्णय घेतला आहे. शिवसेनेत मी चांगलं काम केलं आहे. पण आता राष्ट्रीय भूमिका आणि राज्यातले प्रश्न यासाठी शिंदे यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय मी घेतला आहे." सुषमा अंधारे आल्यामुळे ठाकरे गटातील महिला नेत्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा आहेत.

बंडाच्या एक वर्षानंतरही ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत येणाऱ्यांचा ओघ काही कमी होण्याचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश केला. मनीश कायंदेंनी शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर विश्वास दाखवत एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारीही सोपवली. एकनाथ शिंदेनी मनिषा कायंदेंची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी केली नियुक्ती केली आहे.