Night Curfew: रात्रीच्या 'संचारबंदी'दरम्यान प्रवाशांना मुंबई विमानतळावरून ये-जा करण्याची परवानगी
Mumbai Airport (Photo Credit: PTI)

सध्या सर्वत्र ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. मात्र राज्यावर असलेला कोरोना विषाणूचा (Coronavirus) धोका लक्षात घेता, महाराष्ट्र सरकारने 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी (Night Curfew) लागू केली आहे. या दरम्यान राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात कोणीही बाहेर पडू शकणार नाही. शासनाच्या या निर्णयामुळे ज्या लोकांनी आधीच प्रवासाची तिकिटे किंवा हॉटेल्स बुक केली आहेत त्यांना काही प्रमाणात फटका बसू शकतो. मात्र मुंबईमध्ये ज्यांनी सायंकाळी उशिरा किंवा पहाटे विमानाचे तिकीट बुक केले आहे, अशा प्रवाशांना रात्रीच्या कर्फ्यूची चिंता करण्याची गरज नाही. असे प्रवासी शहरातील विमानतळावरून ये-जा करू शकणार आहेत. मुंबई पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली.

पोलिसांनी सांगितले की, रात्रीच्या कर्फ्यू (रात्री 11 ते सकाळी 6) दरम्यान पाच किंवा अधिक व्यक्तींच्या एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच यावेळी सामाजिक अंतराचे पालन करावे लागेल, मास्क घालणे आणि इतर साथीच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असे व या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाईल. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'कर्फ्यूदरम्यान विमानतळावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल. यादरम्यान कॅब सेवा आणि सार्वजनिक वाहतूक कार्यरत राहणार आहे.'

मुंबई विमानतळ 24/7 खुला आहे आणि रात्री 11 ते सकाळी 6 ते संचारबंदीदरम्यानही सुरू राहील. बहुतेक आंतरराष्ट्रीय विमानांची ये-जा ही रात्रीच्या वेळी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा परिणाम अत्यावश्यक वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यावर होणार नाही (जसे की दूध आणि भाज्या). तसेच यामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत हालचालींना अडथळा येणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. (हेही वाचा: कन्टेमेंट झोन बाहेरील वॉटर स्पोर्ट्स, नौका विहार, करमणूक उद्यानं सुरु करण्यास राज्य सरकारची परवानगी; पर्यटन स्थळं खुली करण्यासही मुभा)

दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत सूट किंवा परवानगी देण्याचे अधिकार विभागीय डीसीपींना देण्यात आले आहेत. परंतु या आदेशाचा भंग करणे हे आयपीसी कलम 188 नुसार दंडनीय आहे, ज्यासाठी सहा महिने शिक्षा किंवा दंडाची तरतूद आहे.