Night Curfew in Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा रात्रीची संचारबंदी? पहा काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे
Rajesh Tope | (Photo Credits- Twitter)

काही राज्यांमध्ये कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रभाव पुन्हा वाढू लागल्याने केंद्राने सावधगिरीचा इशारा दिला आहे. केरळ पाठोपाठ महाराष्ट्रातही (Maharashtra) कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रात्रीची संचारबंदी (Night Curfew) लागू करण्यात येईल. मात्र यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) म्हणाले. ते जालना येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. (COVID-19 Third Wave: 'या' राज्यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; नियमांचे पालन न करणे पडेल महागात)

टोपे म्हणाले की, "ओनम सणामुळे केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली. त्यानंतर केंद्राने राज्याला रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केली आहे. आगामी काळात आपल्या राज्यात येणारे सणवार पाहता काळजी घेण्याची गरज आहे. अशावेळी केंद्राच्या सूचनेची अंमलबजावणी होईल. मात्र याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील." (केरळ-महाराष्ट्रातील Covid-19 प्रकरणांनी केंद्राची वाढवली चिंता; राज्यांना लिहिले पत्र, दहीहंडी आणि गणेशोत्सवासाठी उपयोजना करण्याचा सल्ला)

पॉझिटीव्ह रुग्ण नसलेल्या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु होऊ शकतात का? याची चाचपणी करतोय. तसंच 5 सप्टेंबरपर्यंत सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्चमाऱ्यांच्या लसीकरणासाठी स्पेशल ड्राईव्ह घेण्यात येणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आलीये असं वाटत असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. केरळमध्ये रुग्णसंख्या वाढल्याने नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सोमवारपासून रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे.

दरम्यान, वाढती रुग्णसंख्या पाहता केंद्राने यापूर्वीच राज्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. सण-उत्सव साधेपणाने, नियमांचे पालन करत साजरे करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. तसंच पत्र लिहून नाईट कर्फ्यू लावण्यावर विचार करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे केरळची परिस्थिती, येणारे सणवार आणि वाढते रुग्ण या पार्श्वभूमीवर राज्य केंद्राच्या सूचनांचा विचार करु शकतं. याबद्दलची स्पष्टता काही दिवसांतच येईल.